कऱ्हाड : मुसळधार पावसामुळे कऱ्हाड तालुक्यात कृष्णा आणि कोयना नद्यांची पाणीपातळी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली होती. नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले होते; मात्र चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सकाळी ऊन पडत आहे. दिवसात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत; मात्र उघडीप मिळाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. स्थलांतरित झालेली कुटुंबे घरी परतू लागली आहेत. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे; मात्र पावसाच्या उघडिपीमुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.
शिवाजी विद्यालयात गुरूपौर्णिमा साजरी
कऱ्हाड : येथील शिवाजी विद्यालयात गुरूपौर्णिमा ऑनलाइन पद्धतीने विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक पी. बी. साळुंखे यांनी महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ‘गुरूपौर्णिमा’ या भित्तिपत्रकाचे प्रकाशनही मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आले. प्रांजली पाटील, सिद्धी कदम या विद्यार्थिनींनी गुरूपौर्णिमेनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. बी. आर. यादव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्ही. आर. देसाई, व्ही. आर. पवार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. बी. वाय. मुजावर यांनी आभार मानले.
धायटीतील पूल वाहतुकीसाठी खुला
कऱ्हाड : पाटण तालुक्यातील चाफळसह परिसरात चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने धायटीनजीकचा फरशी पूल पाण्याखाली गेला होता. तसेच पुलाच्या पाइपमध्ये डोंगराचा काही भाग कोसळून पाण्याबरोबर वाहून गेला. फरशी पुलावरून पाणी वाहू लागल्याने सात वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला होता. याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना मिळताच, त्यांनी यंत्रणा कार्यान्वित करून पूल वाहतुकीसाठी सुरळीत केला असून या पुलावरून पूर्ववत वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.