सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात रविवारपासून ढगाळ वातावरण आहे. त्यातच सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास सुमारे अर्धा ताप पाऊस झाला. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने नोकरी, धंद्यासाठी निघालेल्या सातारकरांची यामुळे पळापळ झाली. त्यामुळे अनेकांनी छत्री, रेनकोट घालून बाहेर पडणे पसंत केले.सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तापमानाचा पारा अठरा अंशांवर असतानाही रविवारी थंडी कमी झालेली नव्हती. सोमवारीही सकाळीपासून ढगाळ वातावरण आहे. त्यातच सकाळी दहा वाजता पावसाला सुरूवात झाली.
अचानक चांगला पाऊस पडत असल्याने नागरिकांनी दुकानांमध्ये जाऊन थांबणे पसंत केले. तर राजवाडा, राजपथ, मोती चौक ते पाचशे एक पाटी चौक या दरम्यान पदपथावर किरकोळ वस्तू विक्रीसाठी बसत असलेल्यांची वस्तू भिजू नये म्हणून पळापळ झाली.
नोकरी, व्यवसायासाठी दहा वाजता बाहेर पडणाऱ्यांनी पावसाचा अंदाज बांधून छत्री, रेनकोट आणले होते. त्यामुळे ऐन डिसेंबरमध्ये साताऱ्याच्या रस्त्यावर छत्री, रेनकोट घातलेले पाहायला मिळाले.महाबळेश्वरमध्येही रविवारी दुपारनंतर चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे शेकडो पर्यटकांची पळापळ झाली होती.