वडूज : ‘खटाव-माण तालुक्यांत अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे व इतर पिकांचे नुकसान पंचनामे करण्यास महसूल विभागाची टाळाटाळ व दोन्ही तालुक्यांतील शासकीय वसतिगृहाची दुरवस्था या विषयावर शासन दरबारी आवाज उठविणार आहे,’ अशी माहिती माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी दिली.डॉ. येळगावकर म्हणाले, ‘अवकाळी पावसाने खटाव- माण तालुक्यांत ज्वारी, गहू, हरभरा या पिकांबरोबरच द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील निर्यात होणारी द्राक्ष बागायतदारही अडचणीत आले असून, या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात महसूल विभागाने अद्याप हालचाली केल्या नाहीत. ही बाब महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. संबंधित पिकांच्या व द्राक्ष बागांच्या पंचनाम्याबाबत गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. येत्या चार दिवसांत पंचनामे झाले नाहीत तर थेट माझ्याची अथवा कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले. समाजकल्याण विभागामार्फत खटाव, दहिवडी या ठिकाणी असलेल्या वसतिगृहाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. दोन्ही ठिकाणी शासनाच्या इमारतीऐवजी भाड्याच्या इमारतीत वसतिगृह चालविले जात आहे. याठिकाणी अपुरा कर्मचारी वर्ग, पाणीटंचाई या समस्या जाणवत आहेत. याबाबत आपण समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे यांच्याशी संपर्क साधला आहे. याशिवाय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत खटाव, माण तालुक्यांतील वीजवितरणची अनेक प्रलंबित कामे मार्गी लावल्याचेही सांगून ते पुढे म्हणाले, ‘दोन्ही तालुक्यांत वीज मंडळाची उपकेंद्र मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.वडूजचे रखडलेले तालुका क्रीडा संकुल, भोसरेचे सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक, ‘क’ वर्ग देवस्थानचे रखडलेले अनुदान आदी कामांसंदर्भात आपण शासनदरबारी पाठपुरावा करणार आहे. गत सहा वर्षांत या दोन्ही तालुक्यांचा चोफेर विकास खुंटला आहे. आमदारकीची सत्ता नसली तरी सत्तेच्या जोरावर आणि अनेक मंत्र्यांशी आपले घनिष्ट संबंध असल्याने खटाव-माणचे प्रश्न सुटण्यास चांगली मदत होत आहे. (प्रतिनिधी)
दिशाभुलीबाबत आवाज उठवणार
By admin | Published: March 06, 2015 11:41 PM