सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीतून माघार घेण्यासाठी रामराजेंनी मला एसएमएस केला होता. माघार घेतल्यास स्वीकृत सदस्य पदावर संधी देण्याचे आश्वासनही या एसएमएसद्वारे दिले होते. ते त्यांनी पाळले नाही. राजकारणात कायमस्वरूपी टिळा कुणालाच लावला जात नाही. राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना गांजण्या उठवायची जुनी सवय आहे, या उठलेल्या गांजण्याच राष्ट्रवादीला घातक ठरतील,’ अशी जोरदार टीका आ. शंभूराज देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्हा बँकेत शंभूराज देसाईला स्वीकृत संचालक म्हणून घ्या, अशा विनवण्या आणि गयावया करायला मी बँकेच्या कुठल्याही नेत्याकडे गेलो नव्हतो, तर या निवडणुकीत मी टाकलेल्या माझ्या उमेदवारीने घाबरून केलेल्या रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ‘शंभूराज तुम्ही माघार घ्या, तुम्हाला बँकेत स्वीकृत संचालक म्हणून घेतो,’ असे सांगितले होते. जिल्हा बँकेची निवडणूक आली की बसलेल्या गांजण्या उठवायची राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठांना जुनीच सवय आहे. याचा अनुभव मी स्वत: बँकेच्या अनेक निवडणुकांमधून घेतला आहे. प्रत्येक निवडणुकांचे रामराजे साक्षीदार आहेत. उठलेल्या गांजण्या अनेकदा घातक असतात, हे ज्येष्ठांच्या लवकरच लक्षात येईल. जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ म्हणून रामराजेंचा मान मी ठेवला. बँकेच्या स्वीकृत संचालकपदी मला घेतले नाही, याचा मला अजिबात राग नाही; परंतु रामराजेंनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे रामराजेंच्या बोलण्यावर आणि एसएमएसवर किती विश्वास ठेवायचा यावर भविष्यात मला विचार करावा लागेल. जिल्हा बँकेची निवडणूक लागल्यानंतर मी रितसर संचालक पदासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मी ठेवू नये, यासाठी रामराजे माझ्याशी अनेकदा बोलले. त्यांचा मान राखून मी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षातला एक आमदार आपल्याला बँकेत डोईजड होईल, या करिता रामराजेंनी केलेला डाव माझ्या तेव्हाच लक्षात आला होता; परंतु बँकेची निवडणूक पार पडल्यानंतरही मी स्वीकृत संचालक पदाच्या निवडी होईपर्यंत याबाबत कधीही त्यांच्याकडे अथवा त्यांच्या पक्षाच्या कुणाकडेही विचारणा केली नव्हती. (प्रतिनिधी) रामराजे...जमत नसेल तर शब्द देऊ नका! ‘रामराजेंच्या शब्दांना जिल्हा बँकेत किती किंमत दिली जाते, हे नुकत्याच झालेल्या स्वीकृत संचालकांच्या निवडीवरून लक्षात आले आहे, त्यामुळे रामराजेंनी जमत नसेल तर भविष्यात कुणाला शब्द देऊ नये आणि दिलाच, तर तो पाळायला शिका,’ असा तिरकस सल्लाही आ. देसाई यांनी दिला आहे. तो एसएमएस अजूनही सेव्ह.. ‘जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यास स्वीकृत संचालकपद देण्याचा रामराजेंनी पाठविलेला एसएमएस अजूनही माझ्याजवळ आहे,’ असेही आ. देसाई यांनी या पत्रकात म्हटले आहे.
उठविलेल्या गांजण्या राष्ट्रवादीला घातक
By admin | Published: February 02, 2016 1:04 AM