कऱ्हाड : बँक कर्मचाऱ्याला भररस्त्यात मारहाण करून त्याच्याकडील पंधरा लाखांची रोकड असणारी बॅग चोरट्यांनी लंपास केली. शहरातील दत्त चौक ते भेदा चौक मार्गावर एका बँकेच्या शाखेनजीक शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर पोलिसांनी शहरभर नाकाबंदी केली; मात्र दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील दत्त चौकात रयत सहकारी बँकेची शाखा आहे. ही बँक शिक्षण क्षेत्राशी निगडित असून, इतर बँकांना रविवारी साप्ताहिक सुटी असताना रयत बँक मात्र सुरूच असते. त्यासाठी ‘रयत’चा ज्या बँकेत भरणा आहे, त्या बँकेतून पैसे काढून ते बँकेत आणून ठेवले जातात. शनिवारी सकाळीही बँकेचे कर्मचारी बाजीराव पाटील व संजय जाधव यांना एका बँकेच्या भेदा चौकानजीकच्या शाखेतून पैसे काढून आणण्यास सांगण्यात आले. त्यानुसार पाटील व जाधव त्या बँकेमध्ये गेले. बाजीराव पाटील यांनी त्यांच्याजवळील पंधरा लाखांचा धनादेश क्लिअरिंगसाठी दिला. संबंधित धनादेश कॅशिअरकडे गेल्यानंतर कॅशिअरने अकाऊंटची तपासणी करून पंधरा लाख काढले. संबंधित रोकड त्याने बाजीराव पाटील यांच्याकडे दिली. बाजीराव पाटील यांनी पैसे बॅगेत ठेवले. त्यानंतर सहकारी जाधव यांना सोबत घेऊन ते बँकेच्या पायऱ्या उतरत होते. त्यावेळी अचानक एकजण त्यांच्याजवळ आला. त्याने पाटील यांच्या हातातून रोकड असलेली बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला; मात्र पाटील यांनी त्याला विरोध केला. त्यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. आसपासच्या नागरिकांना काही समजण्यापूर्वीच संशयिताने बॅग हिसकाविताना पाटील यांना जिन्यातून खाली ओढले. त्यामुळे ते रस्त्यावर पडले; मात्र तरीही त्यांनी हातातील बॅग सोडली नाही. संशयित मारहाण करीत असताना पाटील यांनी बॅग घट्ट पकडली होती. दरम्यान, दुचाकीवर थांबलेला दुसरा संशयित त्या ठिकाणी आला. त्याने रस्त्यावर पडलेल्या पाटील यांच्या पायावर दुचाकी घातली. त्यावेळी जखम झाल्याने पाटील यांच्या हातातील बॅग सुटली. पंधरा लाखांची रोकड असलेली बॅग हाताला लागताच चोरटे दुचाकीवर बसून भरधाव निघून गेले. घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. माहिती मिळाल्यानंतर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणीही केली. चोरटे ज्या दुचाकीवरून पसार झाले त्या दुचाकीचे वर्णन मिळाल्याने पोलिसांनी दुचाकींची बारकाईने तपासणी केली. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबतची फिर्याद बाजीराव पाटील यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत दिली आहे. चोरटे ‘सीसीटीव्ही’त कैद बाजीराव पाटील व त्यांचे सहकारी एका बँकेत आले असताना संशयितांनी त्यांच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती. एक संशयित त्यांच्या मागे बँकेमध्येही आला होता. संबंधित चोरट्याच्या हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या असून, पोलिसांनी बँकेतून ते फुटेज ताब्यात घेतले आहे. त्या आधारे सध्या तपास केला जात आहे.
रयत बँकेचे पंधरा लाख रुपये लुटले
By admin | Published: October 15, 2016 11:48 PM