सातारा : तब्बल दहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गांधी मैदानावरील चौपाटी शनिवारी सुरू झाली. खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबतचे आदेश हातगाडीधारकांना दिले. मात्र ‘घाण दिसली की चौपाटी बंद’ असा इशाराही त्यांनी दिला. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, तर दुसरीकडे गर्दीने गजबजणारी चौपाटी पुन्हा सुरू झाल्याने आता प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
साताऱ्यातील गांधी मैदानावर भरणाऱ्या राजवाडा चौपाटीला तब्बल चार दशकांची परंपरा आहे. गतवर्षी कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून चौपाटी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सलग आठ महिने ही चौपाटी बंद होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व निर्बंध हटविण्यात आले; परंतु चौपाटीवरील हातगाडीधारकांचा प्रश्न जैसे थे होता. पालिका प्रशासनाकडे वारंवार विनवणी केल्यानंतर पालिकेकडून आळूचा खड्डा येथील जागा हातगाड्या सुरू करण्यासाठी देण्यात आली; परंतु दोन्ही बाजूला असलेल्या ओढ्यांमुळे व अस्वच्छतेमुळे हातगाडी सुरू करूनही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नव्हता.
अखेर चौपाटीचा विषय खासदार उदयनराजे भोसले यांच्या कोर्टात गेला. शनिवारी सकाळी हातगाडी धारकांनी जलमंदिर येथे थेट उदयनराजे भोसले यांची भेट घेतली व त्यांच्यापुढे आपली कैफियत मांडली. उदयनराजेंनी तातडीने चौपाटी सुरू करण्याचे आदेश दिले; मात्र ''घाण दिसली की चौपाटी तातडीने बंद करू'' असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, व्यावसायिकांनी फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, ज्यांच्या दोन-तीन गाड्या आहेत त्यांनी केवळ एकच गाडी लावावी, राजवाड्यालगत कोणीही व्यवसाय करू नये, वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने गाड्या लावू नये, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सातारा शहरात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून गर्दी होईल अशा सर्व कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत राजवाडा चौपाटी सुरू झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हातगाडीधारकांची उपासमार होत असल्याने चौपाटी सुरू करण्यात आली असली, तरी या संकटातून आता प्रशासन नेमका काय मार्ग काढते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून गांधी मैदानावर चौपाटी सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(चौपाटीचा लेखाजोखा)
दहा महिन्यांपासून चौपाटी बंद
१२ कोटींचा फटका
९० अधिकृत हातगाड्या
२५ अनधिकृत हातगाड्या
(चौकट)
कुठे गेली युनियन क्लबची जागा...
राजवाडा बसस्थानकाच्या मागील बाजूस युनियन क्लबची सुमारे तीस गुंठे जागा आहे. या जागेवर चौपाटी सुरू करण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन होते. आजवर याबाबत केवळ चर्चा करण्यात आली; परंतु चौपाटी या जागेवर स्थलांतरित करण्याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. जर या जागेचा विकास केला असता, तर राजवाडा चौपाटीचा सुरू असलेला खो-खो चा खेळ कधीच थांबला असता.
(पॉईंटर्स)
...तर कारवाईचा बडगा
- जिल्ह्यासह सातारा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे चौपाटीवरील सर्व विक्रेते व कामगारांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
- जिल्हा व पालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक हातगाडीधारकांना कोरोना चाचणी करून घ्यावी लागणार आहे.
- फिजिकल डिस्टन्स पाळला जाईल याचीदेखील काळजी घ्यावी लागणार आहे.
- मास्क व सॅनिटायझरचा वापर करून स्वच्छतेला प्राधान्य द्यावे लागणार आहेत.
- नियमांचे उल्लंघन केल्यास पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
(कोट)
आमच्या व्यथा लक्षात घेउन खा. उदयनराजे भोसले यांनी चौपाटी सुरू करण्यास परवानगी दिली. हातगाडीधारक सर्व नियमांचे काटेकोर पालन करतील. सुरक्षेची पुरेपूर काळजी घेऊन व्यवसाय केला जाईल.
- संजय पवार, शहराध्यक्ष
हॉकर्स संघटना, सातारा जिल्हा
फोटो मेल : चौपाटी
साताऱ्यातील गांधी मैदानावर तब्बल दहा महिन्यांनंतर हातगाड्या लावण्यात आल्या. सातारकरांच्या जिभेचे चोचले पुरवणारी चौपाटी शनिवारपासून सुरू झाली.