सातारा, दि. १२ : सुरुचि बंगल्यावरील धुमश्चक्री प्रकरणी पोलिसांनी दोन्ही राजेंच्या सुमारे तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. अटक केलेल्या संशयितांकडून जशी नावे निष्पन्न होतील, तसे कार्यकर्त्यांना पोलिस अटक करीत आहेत. ऐन दिवाळीच्या सणामध्ये अटक होऊ नये म्हणून दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी वकिलांच्या कार्यालयात हेलपाटे मारण्यास सुरुवात केली आहे.
रात्री-अपरात्री आपल्या ओळखीच्या वकिलांच्या कार्यालयात जाऊन अटकपूर्व जामिनासाठी काय-काय करावे लागेल? याची माहिती घेत आहेत. गुन्हे दाखल झालेले अनेक कार्यकर्ते साताºयामध्येच आहेत. मात्र, पोलिसांना दिसल्यास अटक होईल, या भीतीपोटी हे कार्यकर्ते रात्रीचे बाहेर पडत असून, तेही वकिलांच्या कार्यालयात जाण्यासाठी. जामिनासाठी लागणारी कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी मित्रांचे सहकार्य घेतले जात आहे.
केवळ कागदपत्रे तयार करण्यासाठी खास म्हणे टीमही तयार करण्यात आली आहे. या टीमच्या माध्यमातून आपापल्या कार्यकर्त्यांची न्यायालयातून सुटका कशी होईल? हे पाहात आहेत. जामिनासाठी लागणारी कागदपत्रे अत्यंत किचकट असल्यामुळे कार्यकर्त्यांचा कस लागत आहे. एका व्यक्तीला दोन जामीन लागतात. त्यामुळे जामीनदार मिळवितानाही दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांची पळताभुई थोडी झाली आहे.
घटनेदिवशी आम्ही तेथे नव्हतोच, हे दर्शविण्यासाठी काहीजण पुरावे तयार करत आहेत. यदा-कदाचित पोलिसांनी अटक केली तर हे पुरावे न्यायालयात उपयोगी पडतील, अशी अनेकांनी खबरदारी घेतली आहे.
सुरुचिवर झालेल्या धुमश्चक्रीवेळी पोलिसांनीही शुटिंग केल्यामुळे दोन्ही राजेंचे बरेच कार्यकर्ते त्या शुटिंगमध्ये कैद झाले आहेत. त्यामुळे पोलिसांना कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नगरसवेक बाळासाहेब खंदारे, माजी नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांच्यासह अन्य पाचजणांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर शुक्रवारी (दि.१३) निर्णय होणार आहे.