सातारा : भावाचा खिसा कापायचा आणि बहिणींनी दीड हजारांची ओवाळणी द्यायची. निवडणुकीसाठी शासनाचा हा भुलविण्याचा प्रकार आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रस्थापित दोन्ही आघाड्यांची विचारधारा एकच आहे. त्यामुळे परिवर्तन महाशक्ती ही निवडणुकीत ताकदीने उतरणार आहे, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके आदी उपस्थित होते.राजू शेट्टी म्हणाले, विधानसभा निवडणुकीत परिवर्तन महाशक्ती सक्षम पर्याय म्हणून उभी राहणार आहे. कारण, आताची लढाई ही प्रस्थापितांविरोधातील आहे. राज्यातील २०० ते २२५ घराण्यातच सत्ता राहते. त्यांच्याकडूनच सोयीचे राजकारण होते. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्याऱ्थी या सर्वांना ताठ मानेने जगता येईल असा आमचा निवडणुकीत जाहीरनामा राहणार आहे. तसेच या निवडणुकीसाठी मराठा समाज आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्याही संपर्कात आहोत. त्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न आहे.समृध्दी महामार्गामुळे आमदारांचा दर ५० कोटींवर गेला. आता शक्तीपीठामुळे आमदाराचा दर किती निघेल हे बघा. पण, या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने घेतल्या जातात. सामान्यांची थडगी बांधून विकास करतात का ? याबाबत आघाडी आणि महायुतीनेही भूमिका स्पष्ट करावी. तसेच दुसरीकडे तिजोरी जनतेसाठी उघडी केली म्हणायची. पण, चंगळवादातून गुलाम तयार करण्याचे काम सुरू आहे. बहिणीलाही दीड हजार दिले म्हणायचे अन् दुसरीकडे स्टॅंप ५०० रुपयांचा करायचा. असले धंदे सरकारने बंद करावेत, असे आव्हानही शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिले.
भावाचा खिसा कापून बहिणींनी दीड हजार; राजू शेट्टींचे सरकारवर टीकास्त्र
By नितीन काळेल | Published: October 16, 2024 6:44 PM