लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राजवाडा चौपाटीवरील चार हातगाडीधारकांना कोरोनाची लागण झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव चौपाटी बंद ठेवण्याचे आदेश मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी शुक्रवारी शहर विकास विभागाला दिले. संबंधित परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झाला असून, हातगाड्यांच्या परिसराला बॅरिकेटिंग केले जाणार आहे.
साताऱ्यातील राजवाडा चौपाटीचा विषय सर्वाधिक चर्चेचा ठरला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही येथील शंभरहून अधिक विक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली नव्हती. यानंतर दोन महिन्यांपूर्वी आळूचा खड्डा येथे पालिका प्रशासनाने हातगाडीधारकांना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, ग्राहक फिरकत नसल्याने विक्रेते आर्थिक संकटात सापडले होते. अखेर हा प्रश्न खा. उदयनराजे भोसले यांच्या कोर्टात गेला आणि त्यांनी तातडीने राजवाडा गांधी मैदानावर चौपाटी सुरू करण्याचे आदेश दिले. तब्बल वर्षभरानंतर चौपाटी सुरू झाली खरी; परंतु हातगाडीधारकांच्या मागे लागलेली समस्यांची शुक्लकाष्ट काही सुटलेली नाही.
खाद्यपदार्थाच्या गाड्या सुरू करण्यापूर्वी येथील ७५ हातगाडीधारकांनी कोरोना चाचणी केली. यापैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून चौपाटीवर आठ ते दहा हातगाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, विक्रेत्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागल्याने मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सुरक्षिततेचा कारणात्सव चौपाटी बंद करण्याचे आदेश शुक्रवारी हर विकास विभागाला दिले.
जोपर्यंत चौपाटीवरील सर्व विक्रेत्यांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त होत नाहीत तोपर्यंत चौपाटी बंद राहणार असल्याचे बापट यांनी सांगितले. ज्या विक्रेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यांच्या हातगाड्यांना बॅरिकेटिंग करणे शिवाय संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत.
(चौकट)
धास्ती कायम...
सातारा पालिकेने कस्तुरबा व गोडोली येथील रुग्णालयाच्या माध्यमातून शहरातील व्यापारी, विक्रेते व दुकानदारांची आरटीपीसीआर चाचणी सुरू केली आहे. आठ दिवसांमध्ये साठ व्यापाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. बाधितांची संख्या वाढू लागल्याने पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.