सातारा : राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होत असून भाजप आणि महाविकास आघाडीने सहावी जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे घोडेबाजार व इतर राजकीय घडामोडी टाळण्यासाठी आघाडीने अधिक दक्षता घेतली आहे. यातूनच जिल्ह्यातील आघाडीचे मंत्री आणि आमदारांनी बॅग भरून मुंबई गाठली. तर भाजपचे आमदारही तयारीने पोहोचत आहेत. शिवसेना आणि भाजप असे दोन्ही डगरीवर हात ठेवणाऱ्यांची मात्र गोची झाली आहे.राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जूनला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेनेने खासदार संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर, राष्ट्रवादीने माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली. काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना उतरवले आहे. वास्तविक पाहता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला होता. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बैठक झाली. पण, त्यामधून काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे निवडणूक अटीतटीवर आली. राज्यसभा निवडणुकीतील मतांचे गणित पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक, भाजपचे दोघेजण मतांच्या कोट्यानुसार निवडून येऊ शकतात. सहाव्या जागेसाठी खरी चुरस आहे. शिवसेनेने संजय पवार यांच्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर भाजपनेही धनंजय महाडिक यांना विजयी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. रस्सीखेचात राजकीय घडामोडी आणि आमदारांना गळाला लावण्याचे काम होऊ नये यासाठी महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेतलाय.आघाडीतील आमदारांना मुंबईत बोलवून घेतले. पक्ष आदेशानुसार सातारा जिल्ह्यातून पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण हे मुंबईला पोहोचले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ही गेले आहेत. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे यांनीही मुंबई गाठली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही मुंबईकडे रवाना होणार आहेत.निवडणूक लागल्यापासून सतत चर्चा...राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सतत चर्चा सुरू आहे. सुरुवातीला संभाजीराजे छत्रपती यांच्या निर्णयावरून सुरुवात झाली. भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली नाही, तर शिवसेनेने पक्षप्रवेश केल्यानंतर उमेदवारी देऊ असे स्पष्ट केले; पण त्यांनी नकार दिला. यामुळे भाजपने शिवसेनेवर टीका केली. ही चर्चा संपते तोच शिवसेनेने दुसरा उमेदवार म्हणून कोल्हापूरच्या संजय पवार यांना पसंदी दिली. हे पाहून भाजपनेही राजकीय खेळी करतानाच तिसरा उमेदवार धनंजय महाडिक यांच्या रूपाने जाहीर केला.महाडिक हेही कोल्हापूरचेच. त्यामुळेही चर्चा रंगली. आता तर सहावी जागा पदरात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपने जोरदार तयारी केली आहे. खासकरून शिवसेनेने आपल्या सर्वच आमदारांना दोन दिवसांपूर्वीच मुंबईत बोलवून घेतले आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदारही मुंबईत पोहोचलेत.
आमदार हॉटेलात; अपक्षावर खरा खेळ ! शिवसेनेचे आमदार मुंबईतील हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्यांच्यावर शिवसैनिकांचं लक्ष आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपही आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे. दोन्ही बाजूंनी जय्यत तयारी असताना या निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांवर निवडणुकीचे गणित अधिक पटीने अवलंबून राहणार आहे.