नसीर शिकलगार।फलटण : आज सर्वच क्षेत्रांत तीव्र स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत कोण आपला, कोण परका, याचे भान ठेवता जो तो स्वत:पुरतं जगण्याचा प्रयत्न करीत असतो. आज सख्खा भाऊ दुसऱ्या भावाला पाण्यात बघतो किंवा सख्खे भाऊ घरवाटणी, राजकरण, पैसा यावरून पक्के वैरी झाल्याचे दिसतात. भावाभावात भांडणे वाढत असताना फलटणमधील रामराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर या चुलत भावंडांनी सख्ख्या भावाप्रमाणे नाते टिकवून एक बंधुभावाचा आदर्श निर्माण केला आहे.
आज राजकरण, पैसा, जमीन, नोकरी, उद्योग या क्षेत्रात तीव्र गळेकापू स्पर्धा वाढली आहे. ज्याला त्याला सर्वच पाहिजे, या भावनेने नातीगोती विसरून तो पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. पूर्वीच्या काळी रामायण, महाभारतात देखील अनेक भावंडांची भांडणे झालेली आपण ऐकत आहोत. राजसत्तेसाठी भावाने भावाला मारल्याची उदाहरणे आहेत.
भावाभावातील नाते एखाद्या गोष्टीवरून विकोपाला गेल्याचे आपण पाहत आहोत. आज राजकारणातही सख्खे भाऊ एकमेकांविरोधात निवडणूक लढविताना दिसतात, एकमेकाविरोधात कोर्ट, कचेरीत जाताना दिसतात. मात्र, महाराष्ट्रात किंबहुना भारतात म्हणा फलटणच्या राजघराण्यातील नाईक-निंबाळकर भावंडे याचा अपवाद राहिली आहेत.
फलटणला राजघराण्याचे वलय असून, या राजघराण्यातील सध्याचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, फलटण कृती उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर या तिघा बंधुंनी राजकारणात १९९१ मध्ये प्रवेश केला. तेव्हापासून सर्व सत्तास्थाने आजअखेर त्यांच्याच ताब्यात राहिलेली आहेत. सत्तास्थाने ताब्यात असली तरी या तिघा भावांनी नात्यात सत्तेसाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी कटूपणा आणलेला नाही.संस्कार, अन् आदर्शावर वाटचालयाबाबत अधिक माहिती देताना रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले की, आमचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर व चुलते दिवंगत शिवाजीराजे नाईक-निंबाळकर यांनी घालून दिलेले संस्कार, आदर्श यावरच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांनी आम्हाला एकत्रित बंधूभावाने राहण्याचा दिलेला सल्ला आम्ही आजही मानत आहोत. त्यामुळे आमच्यात एकोपा आहे. या एकोप्यामुळेच तालुक्यात कोणताही भांडणतंटा नाही. त्यामुळे तालुका विकासाबाबत अग्रेसर राहिला आहे.
आज भावाभावात वादविवाद सुरू असत्याचे उदाहरणे असताना हे तिघे बंधू बंधुभाव जपत राहत आहेत. आज रामराजे, रघुनाथराजे, संजीवराजे यांच्यासारखा एकोपा सातारा जिल्ह्यात म्हणा किंवा महाराष्ट्रात कोठेही दिसून येत नाही. वेळप्रसंगी एकमेकासाठी कमीपणा घेणारे हे बंधू आधुनिक काळातील राम, लक्ष्मण, भरत म्हणूनच ओळखले जातात.