फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सलग चौथ्यांदा बाजी मारून सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम पॅनेलने कारखान्यावरील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.सहा जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. त्या सर्व जागा सोमवारी मोठ्या फरकाने राजे गटाने जिंकल्या. श्रीराम कारखाना संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक जाहीर होताच अनेकांनी कारखाना संचालक मंडळावर जाण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. मात्र तीन मतदारसंघांत उमेदवार न मिळाल्याने पहिल्या टप्प्यात श्रीराम पॅनलचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी झाले. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी श्रीराम पॅनलचे आणखी १२ उमेदवार बिनविरोध विजयी झाले.सहा जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. त्याची सोमवारी फलटण बाजार समितीच्या गोदाममध्ये मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. जिंती-राजाळे व गुणवरे-निंबळक या दोन मतदारसंघातील प्रत्येकी तीन जागांसाठी नऊ उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले, त्यापैकी जिंती-राजाळे मतदारसंघातील तीन जागांसाठी सत्ताधारी श्रीराम पॅनेलचे उमेदवार पोपट गणपत जाधव, सुखदेव महादेव बेलदार, शरद विश्वासराव रणवरे हे प्रत्येकी सात हजारांहून अधिक मते घेऊन विजयी झाले. तर या मतदारसंघातील एकमेव विरोधी उमेदवार विनायक तुकाराम शिंदे यांना ८०४ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.गुणवरे-निंबळक मतदार संघातील तीन जागांसाठी सत्ताधारी श्रीराम पॅनेलचे उमेदवार संतोष गजानन खटके, विठ्ठल दादा गौड, दत्तात्रय शंकर शिंदे हे प्रत्येकी सुमारे सात हजार मते घेऊन विजयी झाले, तर या मतदारसंघातील बजरंग दिलीप गावडे व रमेश तुकाराम गावडे यांना अनुक्रमे ७७२ व ६५३ मते मिळाल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.विजयी उमेदवारांचे रामराजे नाईक-निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह अनेकांनी नवनिर्वाचित संचालकांचे कौतुक केले आहे. जिल्हा निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर, सहायक निबंधक तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे, सहायक निबंधक तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एन. के. रुपनवर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
श्रीराम कारखान्यावर रामराजेंचे सलग चौथ्यांदा वर्चस्व, सर्वच २१ जागांवर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 1:55 PM
श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सलग चौथ्यांदा बाजी मारून सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम पॅनेलने कारखान्यावरील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
ठळक मुद्दे श्रीराम कारखान्यावर रामराजेंचे सलग चौथ्यांदा वर्चस्व, सर्वच २१ जागांवर विजय १५ जागा बिनविरोध, ६ जागांवर मोठ्या फरकाने विरोधकांचा पराभव