सातारा : राज्यात पक्षाची सत्ता असो वा नसो... फलटणचा लाल दिवा नेहमीच लखलखता राहिला आहे. राष्ट्रवादीची सत्ता नसतानाही विधान परिषदेच्या सभापतिपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून येण्याचा चमत्कार फलटणच्या रामराजे नाईक-निंबाळकर यांनी घडवून आणला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सत्तेविना राष्ट्रवादी पक्षातील बहुतांश नेत्यांची घालमेल वाढतच चालली आहे. काही कार्यकर्त्यांची चुळबूळ सुरू झाली असून, सत्ताधारी युतीकडे अनेकांची पावले वळाली आहेत. मात्र, आहे त्याच पक्षात राहून सत्तेला स्वत:कडे खेचून आणण्याची किमया रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जगाला दाखविली आहे. राष्ट्रवादीची सत्ता महाराष्ट्रात असताना एका रात्रीत रामराजेंचे जलसंपदा मंत्रिपद शशिकांत शिंदे यांना देण्यात आले होते. त्यावेळी फलटणचे राजकीय अस्तित्व धोक्यात, अशी आवईही काही जणांनी उठविली होती. मात्र, त्यावेळीही अत्यंत शांत राहून रामराजेंनी शरद पवार यांच्यावरच निष्ठा व्यक्त केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही त्यांना माढा मतदारसंघाचे तिकीट मिळेल, अशी चर्चा असताना उमेदवारी सातारा जिल्ह्याबाहेर गेली. तरीही कसलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता रामराजेंनी राष्ट्रवादी पक्षाचाच प्रचार केला.कदाचित, त्यांनी दाखविलेल्या निष्ठेचे फळ म्हणूनच की काय शरद पवार यांनी त्यांना गेल्या वर्षी विधानपरिषद सभापतिपदाची संधी दिली. विधान परिषदेतील संख्याबळाच्या जोरावर रामराजे विनासायास नियुक्त झाले. त्यानंतर पुन्हा एकदा ही संधी रामराजेंना मिळाली असून, यामुळे पवार घराण्याच्या अत्यंत जवळचे विश्वासू नेते म्हणून रामराजेंच्या प्रतिमेवर शिक्कामोर्तब झाले आहे. रामराजे नाईक-निंबाळकर व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील या राम-लक्ष्मणाच्या जोडीने जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवली. गलितगात्र झालेल्या काँगे्रसला मागे सारत राष्ट्रवादीची प्रचंड मोठी ताकद निर्माण करण्यासाठी या दोघांचे मार्गदर्शन फायद्याचे ठरले आहे. निष्ठेसोबतच ‘फरफॉर्मन्स’सुध्दा महत्त्वाचा ठरतो. पक्षाचे नेतृत्व हे कामाच्या माणसाला ताकद देत असते. रामराजेंच्या बाबतीत निष्ठा आणि त्यांचे काम हे फलदायी ठरले आहे. फलटणचा विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर रामराजेंना विधानपरिषदेचे प्रतिनिधीत्व देण्यात आले होते. आता माण-खटावमधून विधानसभा लढण्याची तयारी रामराजेंनी सुरु केली आहे. अनेकदा त्यांना आव्हान देणारे आमदार जयकुमार गोरे यांचा वचपा काढण्यासाठीच जणू पक्षाने रामराजेंना लाल दिवा बहाला केला आहे. आता जयकुमार गोरे व रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. (प्रतिनिधी)रामराजेंकडे नेतृत्वराष्ट्रवादीचा १८ वा वर्धापनदिन नुकताच पार पडला. राष्ट्रवादीतर्फे जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये रामराजेंनी पक्षाच्या स्थापनेच्या इतिहासाची उजळणी सर्वांपुढे मांडली होती. पवारांच्या पाठिशी संघर्षाच्यावेळी निष्ठेने उभे राहिल्याचे त्यांनी सांगितले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार?, हे या निवडीने स्पष्ट झाले आहे. माण-खटाव तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याचे आव्हान रामराजेंपुढे यानिमित्ताने राहणार आहे.
सत्तेचा ‘राम’बाण उतारा पुन्हा लागू!
By admin | Published: July 08, 2016 11:30 PM