ईदचा अर्थ आनंद व फितर म्हणजे दान करणे. हे दान अन्नाच्या स्वरूपात असावे, असा नियम आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव संपूर्ण
महिनाभर रोजे ठेवतात. ईद जवळ येऊ लागते तसा मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहताना दिसतो. रमजानच्या पवित्र
महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत रोज उपवास केले जातात. सूर्य उगवण्यापूर्वी अन्नाचे ग्रहण करायचे आणि संपूर्ण दिवस सूर्यास्त होईपर्यंत उपवास
पाळायचा. सूर्यास्त झाल्यानंतर उपवास सोडून नमाज (प्रार्थना) करायची, असा हा नियम संपूर्ण महिनाभर पाळायचा. या पवित्र दिवसांमध्ये कुराण शरीफ ग्रंथाचे
वाचन दररोज करायचे. वाचन केल्यानंतर चिंतन, मनन केले जावे असा नियम आहे.
बंधुभावाचा हा सण शत्रूलही जवळ करा असा संदेश प्रवाहित करतो. या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह वा मशिदीत नमाज अदा करण्याकरता एकत्र येतात. अल्लाहा प्रती नमाज अदा केली जाते व त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा देतात. नवे कपडे परिधान केले जातात. या दिवशी गोडाधोडाचे पदार्थ आणि सुकामेव्याची सगळीकडे रेलचेल पहायला मिळते. शेजारी आणि नातेवाइकांकडे मिठाईची ताटे पाठविण्याचा देखील प्रघात आहे.
लहान
मुलं आपल्यापेक्षा मोठ्यांकडे ‘ईदी’ मागतात. मोठी मंडळीही वस्तू, पैसे, मिठाई, कपडे या स्वरूपात ‘ईदी’ देत लहानग्यांना खूश करतात. गरिबांची मुलंही श्रीमंतांकडे ईदी मागतात. या ईदीला भीक समजले जात नाही, तर तो लहानांचा हक्क समजला जातो. त्यांना या दिवशी नाराज केले जात नाही.
ईदच्या
पावन पर्वावर मुस्लिम बांधव मोठया वस्तूंची खरेदी करणे शुभ समजतात.
त्यामुळे नवीन गाडी, नवे घर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी या दिवशी मोठ्या प्रमाणात केली जाते.
ईद का चांद
रमजान महिन्यात तिसावा रोजा झाल्यानंतर चंद्र दिसतो. त्याला ईद का चाँद मानले जाते. इस्लामी कॅलेंडरप्रमाणे ईद वर्षातून दोन वेळेस येते. चंद्र दिसल्यानंतर नवा महिना सुरू होतो. पूर्ण जगात एकाच वेळी ईद साजरी व्हावी म्हणून चंद्र दिसल्यानंतरच रमजान ईद साजरी करण्यात येते. महिलांची तयारी तर फार आधीपासून सुरू झालेली दिसते. एखाद्दुसरा रोजा झाल्यानंतर घराघरांतून शेवया तयार केल्या जातात. वाढत्या शहरीकरणामुळे किंवा अतिव्यस्ततेमुळे आता हे चित्र केवळ ग्रामीण भागातूनच दिसते. शहरांमधून या वस्तू आता रेडीमेड मिळत असल्याने येथील स्त्रियांची मेहनत कमी झालेली दिसते. घर सजवले जाते. रंगरंगोटी करून आप्तस्वकीयांना आपल्या घरी शिरखुर्मा खाण्याकरता आमंत्रित केले जाते.
ईदच्या दिवशी तळागाळातील व्यक्तीही सणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांना मदत करण्यास सांगितले आहे; कारण जर गरीब व्यक्ती या दिवशी
चांगल्या गोष्टींपासून वंचित राहत असेल तर ही गोष्ट मुस्लिम धर्माकरता योग्य समजली जात नाही. म्हणून गरीब माणसांना ईदपूर्वी जकात दिली जाते ; जेणेकरून ही वंचित मंडळीही वर्षातील एक दिवस आनंदाने साजरा करू शकतील.
प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरांनी आपल्या जीवनकाळात संपूर्ण मानवजातीला विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. सामाजिक न्याय, समता, उदारता,
समरसता यांचे महत्व विशद केले आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता आपले आयुष्य वाहून घेतले. महंमद पैगंबरांची शिकवण एका विशिष्ट जातिधर्मापुरती मर्यादीत नव्हती तर समस्त विश्वाचे कल्याण व्हावे असे त्यांच्या शिकवणीतून प्रदर्शित होते.
सगळ्या जातिधर्मांतील सण-उत्सवांनी आपल्याला विश्वबंधुत्वाचीच शिकवण दिली आहे. ती आपण अंगिकारायला हवी आणि आपण एक आहोत,
आपली संस्कृती आपली मातृभूमी ही एक आहे; त्यामुळे एकमेकांच्या कल्याणार्थ जे जे करता येईल ते आपण करायला हवे. हाच या सर्व सणांचा संदेश आहे.
- नसीर शिकलगार, फलटण