सातारा : सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानच्यावतीने दिला जाणारा ‘श्री समर्थ रामदास स्वामी’ पुरस्कार समर्थांच्या साहित्य अभ्यासिका आणि समाजप्रबोधन करणाऱ्या मनीषा बाठे यांना जाहीर झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सज्जनगड येथे श्रीराम आणि समर्थ समाधी मंदिरात लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती विश्वस्त बाळासाहेब स्वामी यांनी दिली. ठिकठिकाणी उपासना वर्ग चालविणे, रामदास रामदासी संस्कार शिबिरे, विविध स्पर्धांचे आयोजन करून बालमनावर समर्थ साहित्याचे संस्कार करण्याचे काम त्यांनी केले आहे. मनीषा बाठे यांना अकरा भाषा अवगत असून, गेली बावीस वर्षे त्या समर्थांच्या अप्रकाशित हस्तलिखित यांवर संशोधनही करत आहेत. संशोधनासाठी राज्य शासनाचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार, साहित्य परिषदेचा उत्कृष्ट संशोधन पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड केल्याची माहिती स्वामी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.