Phaltan Politics ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून नेतेमंडळींकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची राळ उडवून दिली जात आहे. अशातच महायुतीत असलेले रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्षाने टोकं गाठलं आहे. रामराजेंनी काल घेतलेल्या मेळाव्यातून टीकास्त्र सोडल्यानंतर आज रणजीतसिंह नाईक निंबाळकरांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"रामराजे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. ही अफवाही असू शकते. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीत तुतारीचं काम केलं होतं आणि विधानसभा निवडणुकीतही ते तुतारीचं काम करणार आहेत," असा दावा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे.
रामराजेंची जोरदार फटकेबाजी, तुतारी हाती घेणार?
रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल फलटण येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पुढचा निर्णय काय घ्यायचा? असा सवाल केला. यावेळी कार्यकर्त्यांमधून 'तुतारी'साठी जल्लोष झाला. यावेळी बोलताना रामराजे यांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, "मला काल काही चॅनेल्सकडून फोन आला, त्यांनी विचारलं तुम्ही अजितदादांना सोडून तिकडे चालले आहे का? मला काय बोलायचं हेच सुचेना. ही चर्चाच झाली नाही, तरीही ती चर्चा राज्यभर पसरली. कदाचित आपल्याच विरोधकांनी ही बातमी दिली असेल. मी तिकडे गेलो तर आपल्याला विधानसभेत कमळावर उभं राहता येईल असं त्यांना वाटत असेल," असा आरोपही रामराजे यांनी केला.