सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे रामराजेंना विधान परिषदेवर पुन्हा संधी देतील. मात्र मला रामराजेंना लोकसभेत पहायचंय, अशी इच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह १० जणांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ही जुलै महिन्यामध्ये संपणार आहे. या निमित्त विधान परिषदेमध्ये बुधवारी रामराजे यांच्यासह १० आमदारांचा निरोप समारंभ आयोजित केला होता, त्याप्रसंगी अजित पवार बोलत होते.रामराजे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार मला पुन्हा संधी देतील, याची मला खात्री आहे. अजितदादांनी शुभेच्छा देताना जे सांगितले, तेही महत्त्वाचे आहे. फलटणचा राजवाडा तुम्हा सर्वांसाठी कायम खुला आहे.सभागृहातील इतर सदस्यांनी रामराजेंच्या विधिमंडळ कौशल्याचे व सभागृहाचे कामकाज चालविण्याच्या पद्धतीचे कौतुक केले. सद्य राजकीय परिस्थितीत रामराजे हेच पुन्हा सभापतीपदाच्या खुर्चीवर पाहिजेत, असा सदस्यांचा सूर पहायला मिळाला.अजितदादांचे सूचक विधान..अजित पवारांनी रामराजेंना विधान परिषदेवर पुन्हा संधी दिली जाण्याचे सूचक विधान केले असल्याने २०२४ पर्यंत रामराजेंना पुन्हा सभापती पदावर ठेवले जाईल तसेच जेव्हा लोकसभेची निवडणूक लागेल, तेव्हा माढा किंवा सातारा लोकसभा मतदारसंघातून त्यांना राष्ट्रवादीकडून लढण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे.
लोकसभेसाठी माढा मतदारसंघातून रामराजे नाईक-निंबाळकर?, अजितदादांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 5:49 PM