'तुतारी' हाती घेण्याची चर्चां; रामराजे नाईक-निंबाळकरांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
By दीपक शिंदे | Published: October 5, 2024 07:36 PM2024-10-05T19:36:23+5:302024-10-05T19:37:05+5:30
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी फलटणची उमेदवारी थेट जाहीर केली. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात फोनवरून जाहीर झालेल्या या ...
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी फलटणची उमेदवारी थेट जाहीर केली. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात फोनवरून जाहीर झालेल्या या उमेदवारीवर अजित पवार राष्ट्रवादीचे बडे नेते रामराजे नाईक - निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटातून बाहेर पडत ते तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे.
फलटण तालुक्यावर वर्चस्व असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी आत्तापर्यंत जो ठरविला तोच उमेदवार विजयी झालेला आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे आणि त्यानुसार उमेदवार देऊन त्याला निवडून आणण्याची पद्धत त्यांनी अवलंबिलेली आहे. असे असताना यावेळी अजित पवार यांनी सोळशी, ता. कोरेगाव याठिकाणी झालेल्या मेळाव्यात एका कार्यकर्त्याच्या मोबाइलवर फोन करत आमदार दीपक चव्हाण हेच फलटणचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. या प्रकारामुळे रामराजे नाईक निंबाळकर हे दुखावले आहेत.
कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतल्याशिवाय असे करणे हे त्यांना अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांचे मत आहे. निर्णय प्रक्रियेत आपल्याला डावलले जात असल्याचे यावरून स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून राष्ट्रवादी अजित पवार गटात रहायचे की तुतारी हातात घ्यायची याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार हे आपले दैवत आहेत असे म्हटले होते. त्यानंतरच बहुतेक त्यांची वाटचाल तुतारीकडे होत असल्याचे जाणवत होते.
स्थानिक नेत्यांना विचारात घेऊन उमेदवार ठरविला गेला पाहिजे. फलटणच्या उमेदवारीबाबत असे झालेले नाही. एखाद्या वरिष्ठ नेत्याने उमेदवार ठरविला असला तरी स्थानिक कार्यकर्ते मतदान करत असतात. त्यामुळे त्यांना विश्वासात घेणे आवश्यक असते. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढे काय निर्णय घ्यायचा हे ठरविणार आहोत. - रामराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती, विधानपरिषद