फलटण : सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे यांना विरोध करण्यासाठी आमदार रामराजे नाईक निंबाळकर निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांना सभासदांनी दिलेला दणका पाहता माढा लोकसभा मतदार संघातील लोकमत कोणत्या दिशेला जाणार याची लिटमस टेस्ट असून रामराजे यांनी विरोधासाठी विरोध करण्याची भूमिका बदलावी लागेल, असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.सिद्धनाथ पतसंस्थेतील गैरव्यवहार, कामगारांची नाराजी समोर आल्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांनी या संस्थेच्या निवडणुकीत लक्ष घालून सत्ता बदलासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी केवळ आमदार गोरे यांना विरोध करण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील या संस्थेच्या सभासदांशी संपर्क प्रस्थापित करून गाठी - भेटी, बैठका, हस्ते - परहस्ते निरोप देऊन सत्ताधारी वाघोजीराव पोळ पॅनलला मतदान करण्याचे आवाहन तर केलेच पण शेवटच्या २ दिवसात आपल्या कार्यकर्त्यांना तालुक्यातील पतसंस्थेच्या सभासदांच्या गाठी भेटी घ्यायला लावून सत्ताधारी पॅनलला मतदान करण्यासाठी प्रयत्न केले.लोकशाहीमध्ये कोणी कोणाला मतदान करावे यावर कसलेही बंधन नसल्याने रामराजे यांच्या कृतीला आपला विरोध नाही, पण सभासदांनी त्यांचे ऐकले नाही. उद्या माढा लोकसभा लढवायला निघालेल्या संजीवराजे यांच्यासाठी तरी मतदार यांचे आवाहन स्वीकारणार का ? हा खरा सवाल या निकालाने निर्माण झाल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे.सिद्धनाथच्या निवडणुकीत रामराजे यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दिलेल्या सत्ताधारी पॅनलला सर्वच्या सर्व १३ जागांवर सुमारे १७०० मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागल्याचे किंबहुना फलटण तालुक्यातही सत्ताधाऱ्यांना पुरेसे मतदान झाले नसल्याचे खासदार रणजितसिंह यांनी सांगितले.
सिद्धनाथ पतसंस्थेत रामराजे यांना दिलेला दणका माढा मतदार संघातील लिटमस टेस्ट : निंबाळकर
By दीपक शिंदे | Published: February 03, 2024 12:05 PM