सातारा : उदयनराजे भोसले यांच्या विरोधात खोटे षड्यंत्र रचून त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यांच्यावरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. तसेच विधानपरिषद सभापती रामराजे यांनी पदाचे भान सोडून केलेल्या वक्तव्याची जबाबदारी स्वीकारुन पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी बुधवारी माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे व उदयनराजे समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उदयनराजे भोसले यांच्यावर काही दिवसांपूर्वी खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. वास्तविक, लोणंद येथील सोना अलायन्स कंपनीमधील कामगारांना न्याय मिळावा म्हणून उदयनराजे प्रयत्न करत होते. त्याबाबत चर्चेची प्रक्रिया सुरू असताना सातारा नगरपालिका निवडणुकीत दारुण पराभव सहन करावा लागल्याने स्वकीयांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या मदतीने षड्यंत्र रचण्याचा उद्योग सुरू केला. त्यातूनच त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.उदयनराजे यांनी नेहमीच जनतेची बाजू मांडली आहे. ते जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमीच राजेपण बाजूला ठेवून प्रसंगी रस्त्यावर उतरले आहेत. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधकांना खटकत होती. ज्यांची पात्रता नाही असे बगलबच्चे पत्रकबाजी करत उदयनराजेंवर टीका करत आहेत. (प्रतिनिधी)रामराजेंकडून म्हणे षड्यंत्राची कबुली...रामराजेंनी जाहीर सभेत बोलताना दोन संपवले आहेत आणि अजून दोन बाकी आहेत, असे जाहीर वक्तव्य केले आहे. यावरून त्यांनी रचलेल्या षड्यंत्रांची कबुली दिली. नैतिकतेच्या गोष्टी करणाऱ्या रामराजेंनी स्वत:च्या पदाचे भान सोडून केलेल्या वक्तव्याची जबाबदारी स्वीकारून आपल्या सभापतिपदाचा राजीनामा द्यावा. तसेच उदयनराजे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
रामराजेंनी राजीनामा द्यावा
By admin | Published: May 03, 2017 11:15 PM