महेंद्र गायकवाड ।पाचवड : काही गावांमध्ये कोरोना पॉझ्रिटव्ह रुग्ण आढळत आहेत. तेव्हापासून गावेही सील करण्यात आली. काही नियम व बंधने पाळून कोरोना विषाणूशी लढा देण्याऐवजी अनेक अनेक गावांमधील लोकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले. मात्र किकलीच्या रणरागिणींनी आघाडी सरकारच्या हाकेस प्रतिसाद देत कोरोना विषाणू विरुद्धच्या रणांगणात झोकून दिले. त्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून आदर्श निर्माण केला आहे.
संपूर्ण जगभरात चार ते पाच महिन्यांपासून कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातही दररोज रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यभरातील अनेक रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना सध्या व भविष्यात रक्ताचा तुटवडा भासू नये, याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत किकलीच्या महिलांनी पुढाकार घेऊन शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे कोटेकोरपणे पालन करून रक्तदान शिबिर यशस्वी केले. महिला बचत गट यांच्याबरोबरच ग्रामस्थ व युवकांनीही या शिबिरामध्ये रक्तदान करून राष्ट्रसेवेमध्ये आपला सहभाग नोंदवला.
किकली गावामधील महिला व युवकांनी एकत्र येऊन यशस्वीरीत्या पार पाडलेले रक्तदान शिबिर खऱ्या अर्थाने कोरोना विरुद्ध दिलेला लढा आहे.देशावर संकटात मदतीसाठी हातप्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे गरजेचे आहे. बाधित रुग्णांची हेळसांड न करता, वेळ पडेल तेव्हा रक्तदान व यासारखे अन्य हितावह कार्य करून देशसेवेचे व्रत आपण सर्वांनी जोपासणे गरजेचे आहे. देशावर संकट आले तेव्हा किकलीतील रणरागिणी पुढे आल्या आहेत, अशा भावना सामाजिक कार्यकर्ते संतोष बाबर यांनी व्यक्त केल्या.