पाचगणी : बेलोशी, (ता. जावळी) गावातील महिलांनी स्वच्छ, सुंदर आणि हरित ग्राम साकारण्याचा संकल्प केला असून, लोकसहभाग आणि एकजुटीच्या माध्यमातून स्मार्ट ग्रामसाठी कंबर कसली आहे. गावातील सर्व महिलांनी श्रमदानातून साफसफाई करीत ओढे आणि नद्यांची पात्रे चकाचक केली आहेत.
आध्यात्मातून समाज विकास साधण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेल्या दत्तात्रय कळंबे महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या गावाला श्रमदानाची शिकवण महाराजांनी दिली. या शिकवणीचा वापर येथील नारीशक्तीने स्मार्ट ग्रामसाठी उपयोगी आणला आहे. गावाच्या सरपंच मंदा बेलोशे यांनी यासाठी गावातील महिलांना हाक दिली आणि सर्व महिला ग्रामस्वच्छतेसाठी एकवटल्या. आपला गाव आपणच स्वच्छ ठेवायचा, अशी जणू शपथच घेतली आणि गावाचा कोपरा ना कोपरा माहिलांनी स्वच्छ करून टाकला. दर रविवारी महिला अभियान राबवून सुका कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी गांडूळखत प्रकल्प तयार करत आहेत.
गावातील सर्व बचत गटांच्या महिलांनीही आपला आर्थिक भार गावाच्या स्वच्छतेसाठी लावला. त्यामुळे या अभियानाला आणखी बळ प्राप्त झाले. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी गावाच्या उत्तरेला वाहणाºया कुडाळी नदीचे पात्र स्वच्छ करून टाकले. नदी पात्रातील दगड गोटे काढून, तेथील शेवाळ, वाहून आलेली घाण गोळा करून त्याची विल्हेवाट लावली आहे.दक्षिणेकडून गावाच्या शेजारून डोंगरातून वाहणारा ओढ्याचा प्रवाहही महिलांनी चकाचक करून स्मार्ट ग्रामसाठी मोलाचे योगदान दिले आहे.गाव स्वच्छतेची शपथप्रत्येक घर आणि गावाला स्मार्ट ठेवण्यासाठी माहिलांचाच मोलाचा वाटा असतो. परंतु ते आपले काम म्हणून अगदी गावाला स्वच्छ ठेवण्याची शपथ बेलोशीकर महिलांनी घेतली असून, ग्राम स्वच्छतेसाठी ग्रामस्थांनी पेटवलेली ज्योत तेवत ठेवण्यासाठी महिला सरसावल्या आहेत. महिलांच्या सहभागाने बेलोशी गावाला स्मार्ट बिरुद लावणारच, असा निर्धार सरपंच मंदा बेलोशे यांनी व्यक्त केला आहे .