उंब्रज : मोबाईल चोरट्याचा धाडसाने पाठलाग करणाºया उंबजच्या रणरागिणी नाजिया नायकवडी (शेख) यांनी दाखविलेल्या धाडसाचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कौतुक केले. ोलिस प्रशासनाच्या वतीने त्यांचा लवकरच सत्कार करणार असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भीक मागण्याचे नाटक करून चार ते पाच मुलांनी उंब्रज येथील सुरभी चौकात राहणाºया चाँद शेख यांच्या बंगल्यातून आयफोन घेऊन पलायन केले होते. ही बाब समोर येताच नाजिया नायकवडी (शेख) यांनी आपल्या मोपेडवरून चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. चोरटे ऊसाच्या शेतात शिरले होते.
नाझीया यांनी रस्त्यावर गाडी लावली अन् स्वत:ही ऊसाच्या शेतात शिरल्या. चोरट्यांपैकी एक जण ऊसाच्या सरीत झोपला होता. त्याला त्यांनी तेथेच पकडले अन् चोरट्यांनी बाजूला फेकून दिलेला मोबाईलही हस्तगत केला. इतर चोरटे फरार झाले तर एकाला त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
नाजिया नायकवडी (शेख) या सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या विद्यमान नगरसेवक आहेत. नाजिया यांचे माहेर मिरज असून उंब्रज सासर आहे. आपल्या सहा महिन्याच्या तान्हुल्याला घरात ठेऊन चोरट्याला पकडणाºया नाजिया नायकवडी (शेख) यांचे ग्रामस्थांमधून कौतुक करण्यात आले.
पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनीही नाजिया नायकवडी-शेख यांच्या धाडसाचे कौतुक करून पोलिस प्रशासनाच्या वतीने त्यांचा सत्कार करणार असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.महिलांनी असे धाडस करताना स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी अनुचित प्रकार घडत असेल तेथून पोलिसांच्या १०० नंबर वर फोन करून माहिती कळवावी. तसेच महिलांसाठी असलेल्या १०९१ नंबरवर संपर्क साधावा. पोलिस तत्काळ घटनेच्या ठिकाणी हजर होतील.- संदीप पाटील,जिल्हा पोलिस अधीक्षक