औंध : औंध येथे शनिवारी जोर मारण्याच्या स्पर्धेचे चारुशिलाराजे प्रतिष्ठान, राजेंद्र माने मित्र समूह, शुभम शिंदे मित्र समूह, बाळराजे तालीम संघ औंध यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सातारा, सांगली, पुणेसह विविध भागातून स्पर्धक आले होते. शामगावच्या नऊ वर्षांच्या स्वप्नील फाटकने चौदा मिनिटांत पाचशे जोर मारून प्रथम क्रमांक पटकावत उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे, राजेंद्र माने, शुभम शिंदे, दीपक कदम, शीतल देशमुख, शुभांगी हरिदास, वहिदा मुल्ला, वसंत जानकर, अनिल माने, नारायण इंगळे, किसन तनपुरे, तानाजी इंगळे, भरत यादव, गणेश हरिदास, मुराद मुलाणी, बाळराजे तालीम संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दहा दहा स्पर्धकांचे गट पाडून स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. यामध्ये आठ ते तीस वर्षांपर्यंत स्पर्धकांनी सहभाग घेतला. दोन युवतींनी ही स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत स्वप्नील फाटक प्रथम क्रमांक, सिद्धार्थ सोनवणे द्वितीय, संदेश जाधव तृतीय, वैष्णव पोळ याने चतुर्थ क्रमांक पटकावला तर प्रसाद पोळ, ईश्वर माने, आदित्य आगळमे यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले.
स्पर्धेला अनेक राजकीय, सामाजिक, कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या.
चौकट :
छोट्यांनी केली मोठ्यांची दैना
सहभागी सर्व मोठ्या स्पर्धकांना वाटत होते की आम्ही विजेते होणार मात्र सर्वात कमी वेळेत चिमुकल्यांनी ५०० जोर काढत मोठ्यांची दैना केली.
फोटो
औंध येथे चारुशिलाराजे प्रतिष्ठान,राजेंद्र माने मित्र समूह,शुभम शिंदे मित्र समूह यांच्या वतीने आयोजित जोर मारणे स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.(छाया-रशिद शेख)