फलटण : राज्यात स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत फलटण नगरपरिषद २२६ व्या क्रमांकावर आहे. ही गोष्ट भूषणावह नाही. या स्पर्धेत रंगरंगोटीस १० गुण आहेत त्यात नगरपरिषदेस केवळ २ गुण मिळालेत मग त्यावर २२ लाखांच्या खर्चास मंजुरी कशासाठी? असा सवाल अनुप शहा यांनी उपस्थित केला. यावर मुख्याधिकारी जाधव यांनी बाकीच्यांनी कोटी रुपये खर्च केल्याचे निदर्शनास आणून दिले; परंतु अनुप शहा यांनी कोटी खर्च केले असले तरी बक्षिसाचे पाच कोटी कमावले तुम्ही काय मिळवलं? असा सवाल उपस्थित केला.
फलटण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर सभागृहात नगराध्यक्षा नीता नेवसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तब्बल पावणेचार तास चाललेल्या या मॅरेथॉन सभेत सत्तारुढ व विरोधी नगरसेवक विरुद्ध मुख्याधिकारी प्रशासन असे चित्र पाहावयास मिळाले. सभागृहास अर्धवट माहिती दिल्याबद्दल आणि कर्मचारी ऐकत नसल्याबद्दल मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांच्यावर दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्कीजनक वेळ आली.
या सभेत एकूण २५ विषय सभागृहात मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांपैकी बऱ्याच विषयांवर वादळी चर्चा झाली. विरोधी नगरसेवकांच्या बरोबरीने सत्ताधारी नगरसेवकांनीही प्रशासकीय अधिकारी व कर्मचाºयांना मनमानी कारभाराबाबत चांगलेच फटकारत धारेवर धरले. या विषयांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियान, भुयारी गटार योजनेसाठी जागा संपादित करणे, वृक्ष लागवडीचा कार्यक्रम, शहरातील अतिक्रमणे, रिंगरोड येथे डिव्हायडर बांधणे, २०१५-१६ चा लेखापरीक्षण अहवाल सादर करणे, वैयक्तिक शौचालय उद्दिष्ट्यपूर्ती, राडारोडा उचलणे यासह अन्य विषय वादळी चर्चेचे ठरले.सेभेत पहिल्या इतिवृत्ताच्या विषयापासूनच सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी आक्रमक रूप धारण केले होते. इतिवृत्त सर्वांना पोहोच करू, असे मागील मीटिंगला ठरले होते; परंतु तसे झाले नाही.
त्यामुळे त्याचे वाचन करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली. मात्र इतिवृत्ताच्या प्रती कुठल्याही नगरसेवकांपर्यंत पोहोचल्या नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. सभेत शहरातील रिंगरोडवर डिव्हायडर बांधण्याच्या विषयास विरोध दर्शविण्यात आला. नवीन कामाआगोदर पूर्वीचे शहरात जे डिव्हायडर आहेत, त्यांची दुरवस्था झाली ते दुरुस्त करा. चौका-चौकातील अतिक्रमणे हटवून चौक मोठे करा, शहरातील अंतर्गत रस्ते नीट करा, मगच नवीन डिव्हायडरचा विचार करावा. अतिक्रमणे काढून डिव्हायडर टाकण्यास रघुनाथराजे यांनीही दुजोरा दिला.
शहरात आता नवीन डिव्हायडरचे काम केले तर शहरात भुयारी गटार योजनेकरिता खोदकाम सुरू आहे. त्याचा फटका या कामास बसेल व सर्व निधी वाया जाईल, असे समशेरसिंह यांनी निदर्शनास आणून दिले; परंतु जर या विषयास मंजुरी देण्यात आली नाही तर निधी परत जाईल, असे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगताच निधी जाऊ नये म्हणून काम करायचे व पुन्हा सहा महिन्यांनी पुन्हा तेच काम व नवा निधी म्हणजे प्रशासनाचा कारभार जनतेच्या सोयीसाठी नसून ठेकेदारांची घरे भरण्यासाठी आहे का, असा संतप्त सवाल सचिन सूर्यवंशी बेडके व सचिन अहिवळे यांनी विचारला. सभागृह व प्रशासन यांचा मेळ घालताना नगराध्यक्षांना करावी लागलेली कसरत व कर्मचाºयांच्या चुकीमुळे मुख्याधिकारी जाधव यांना भर सभागृहात व्यक्त करावी लागलेली दिलगिरी या बाबींमुळे ही सभा शहरात चर्चेची ठरली.रिंगरोडवरील ६७ वृक्षांच्या कत्तलीस जबबादार कोण...?‘शहरी भागात वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम हाती घेणे, हा विषय येताच आक्रमक झाले. वादळी पावसानंतर झाडे सवळण्याच्या नावाखाली रिंगरोडवरील एकूण ६७ झाडांची कत्तल करण्यात आली आहे. ही झाडे केवळ कमरेपर्यंत ठेवण्यात आली आहेत. जर नगरसेवकांच्या तक्रारीवरून एक झाड तोडले म्हणून व्यावसायिकावर गुन्हा नोंद होत असेल तर एवढ्या मोठ्या प्रमावर झालेल्या वृक्षतोडीस जबाबदार कोण ? या प्रकरणी कोणी कुणावर गुन्हा दाखल करायचा, असा सवाल नगरसेवक रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी केला.
जागा संपादितच्या विषयाला स्थगितीची मागणी, नगराध्यक्षांकडून मान्यभुयारी गटार योजनेकामी जागा संपादित करण्याच्या विषयात दर्शविण्यात आलेल्या सर्व्हे नंबरला सचिन सूर्यवंशी-बेडके यांनी जोरदार हरकत घेतली. यात दर्शविण्यात आलेल्या सर्व्हे नंबर २०/२ ब हा नंबरच अस्तित्वात नाही. नंबर एक व जागा दुसरीच असा प्रकार आहे. ज्या जागेबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ती जागा कशी संपादित करता येईल, असा प्रश्न बेडके यांनी उपस्थित केला व याप्रश्नी योग्य पाहणी करून मगच निर्णय घेण्यात यावा तोपर्यंत हा विषय स्थगित ठेवावा, अशी मागणी करण्यात आली व नगराध्यक्षांनी ती मान्यही केली.