करंजे : सातारा शहरात अजूनही काही ठिकाणी जुने सुरपाट्यासारखे पारंपरिक खेळ खेळले जात आहेत. आजकाल नवीन पिढी मोबाईलमध्ये व्यस्त असते. त्यांना शारीरिक कसरतीचे खेळ अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे त्यांचा शारीरिक विकास घडत नाही. परंतु या लॉकडाऊनच्या काळात करंजे गावात सुरपाट्यांचा खेळ युवक आवडीने खेळत आहेत.
विशेष म्हणजे हा खेळ खेळताना सोशल डिस्टन्सिंग असते व तुमच्या शारीरिक हालचालीही वेगाने होतात. तुमचे शरीर निरोगी राहते आणि तुम्ही बऱ्याच आजारांपासून दूर राहता. आजकाल हे खेळ नवीन युवकांना माहीत नाहीत आणि हे खेळ खेळताना नियम कडक असतात. काही दिवसांपूर्वी हा खेळ पाहण्यासाठी क्रीडा अधिकारी व शारीरिक व्यक्तिमत्त्व विकास संस्था यांनी येथे भेट दिली व हा खेळ कसा खेळला जातो आणि शारीरिक हालचाली कशा पद्धतीने होतात, याची पाहणी केली. त्यांनी या खेळाबद्द्ल प्रशंसा केली आणि हा खेळ युवकांनी मीडियामार्फत लोकांपर्यंत पोहोचवला जाईल, याची कल्पना दिली व हा खेळ शालेय स्तरावर शिकविण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांनी हा खेळ खेळून शारीरिक विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत.
अजूनही बरेच खेळ गावात खेळले जातात व त्यातून युवक वर्ग मोबाईलपासून कोसोदूर राहील, याची काळजी गावातील ज्येष्ठ नागरिक घेतात. विशेष म्हणजे हे खेळ खेळताना गावातील नगरसेवक, डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक, सरकारी अधिकारी, युवक वर्ग एकत्र येऊन खेळतात. सातारा शहरातील युवकांनी हे खेळ शिकून दररोज खेळावेत, अशाने तुमचे आरोग्यही चांगले राहील व पुढील पिढीला हे खेळ खेळता येईल व जुन्या खेळांचा ठेवा, हा असाच पुढे चालत राहील.
कोट..
दिवसभर ओपीडीमधून थकून आल्यावर शरीर अगदी कंटाळवाणे झालेले असते. मग रात्री जेवणानंतर मी शारीरिक व मानसिक ताण कमी करण्यासाठी सुरपाट्या खेळायला जातो. फक्त अर्धा तास जरी मी खेळलो, तरी दिवसभराचा ताणतणाव कमी होतो. डॉक्टर म्हणून मी माझ्या पेशंटला निरोगी राहण्यासाठी हा खेळ खेळण्यासाठी सांगतो.
-विकास फरांदे ( डॉक्टर )
कोट..
सुटीला आल्यावर सगळे मित्र परिवार सायंकाळी गावाच्या पटांगणात खेळाच्या नादाने भेटायचे. त्यामुळे सगळ्यांना भेटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सुरपाट्यांचा खेळ. राष्ट्रीय पातळीवर हा खेळ खेळला जावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
-ईश्वर तावस्कर, खेळाडू
फोटो आहे...
13करंजे
करंजे (ता. सातारा) येथे दररोज रात्रीच्यावेळी पारंपरिक सुटपाट्यांचा खेळ रंगत आहे.