सातारा : रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी साताऱ्यात आजवर अनेक आंदोलने झाली. कोणी खड्ड्यात वृक्षारोपण केले तर कोणी रस्त्यावर लोटांगणही घातले; परंतु शुक्रवारी दुपारी पोलिस मित्र मधुकर शेंबडे यांनी रस्त्यावरील खड्ड्यात चक्क रांगोळीच रेखाटली. या अनोख्या आंदोलनाची शहरात खुमासदार चर्चाही रंगली.
सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांचे पावसापूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे; परंतु अंतर्गत रस्ते अजूनही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. पालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून मुजविले असले तरी वाहनधारकांची परवड काही थांबलेली नाही. शहरातील यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयाच्या समोर रस्त्याच्या मधोमध पडलेला महाकाय खड्डा वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. या खड्ड्यात दुचाकी वाहने आढळून अनेकजण जायबंदी झाले आहेत. या खड्ड्याची अनेकदा मलमपट्टी करण्यात आली, मात्र त्याचा काही एक उपयोग झालेला नाही. मागणी करूनही या दुरुस्ती होत नसल्याने शुक्रवारी दुपारी पोलिस मित्र मधुकर शेंबडे यांनी या खड्ड्याच्या भोवती रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. या आंदोलनावेळी काही काळ वाहतूक विस्कळीतही झाली. प्रशासनाने खड्ड्याची योग्य पद्धतीने डागडुजी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मधुकर शेंबडे यांनी दिला आहे.