रहिमतपूर : श्रीमंत रोकडेश्वर कोजागिरी उत्सव मंडळ व ज्ञानवर्धिनी गु्रपच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत राज्यभरातील ७३ कलाकारांनी सहभाग घेत रांगोळीतून विविध सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकला. रंगावलीकारांनी आपल्या कलाविष्कारातून मल्हार मार्तंड व म्हाळसादेवीचे दर्शन अन् पंढरीची वारीही घडविली. या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ असून सोमवारी (दि.२६) सकाळी साडेदहा वाजता स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही रहिमतपूर येथे राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबई, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, दापोली, नाशिक, पुणे, सातारा, कऱ्हाड तसेच बेळगाव येथून ७३ स्पर्धकांनी सहभाग घेऊन रांगोळीच्या माध्यमातून विविध व्यक्तिरेखा साकारल्या. बालमजुरी, बेटी बचाव अशा सामाजिक प्रश्नांवर आपल्या कलेच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्याबरोबरच अनाथांची माता सिंधुताई सपकाळ, सिनेमाचे पोस्टर, बालपण, प्रतापगड, नृत्य अशा एकापेक्षा एक सुंदर कलाकृती कलाकारांनी साकारल्या आहेत.सोमवारी सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिरीष चिटणीस, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, दीपक पवार, वासुदेव माने यांच्या हस्ते व चित्रलेखा माने-कदम यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ वीरशैव लिंगायत जंगम मठ येथे होणार आहे. सुमारे ९५ हजार रुपयांची साठ बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. (वार्ताहर) प्रदर्शन आजपासून सोमवार, दि. २६ रोजी दुपारी २ ते रात्री २, मंगळवारी सकाळी ८ ते रात्री १० व बुधवारी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले राहणार आहे. यासाठी ५ रुपये प्रवेशमूल्य आहे. प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन काकासाहेब निकम यांनी केले आहे.
कलेच्या पंढरीत रांगोळीचे कण बनले वारकरी!
By admin | Published: October 25, 2015 10:49 PM