सचिन मंगरुळे -- म्हसवड -रांजणी, ता. माण येथे ‘जलयुक्त शिवार’ योजनेतून काम झाले. त्याचबरोबर डोंबिवली फाउंडेशनने हे गाव दत्तक घेऊन स्वखर्चातून जलसंधारणाची कामे केली. यामुळे या गाव व परिसरात एका पावसातच लाखो लिटर पाणीसाठा झाला आहे. बंधारे तुडुंब भरल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे. आपल्याच गावात एवढा मोठा पाणीसाठा पाहून त्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. नुकतेच रांजणीतील सिमेंट बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माण तालुका म्हटले की दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा. परंतु आता तालुक्याची ही ओळख काहीसी पुसली जाऊ लागली आहे. राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ योजनेतून कामे सुरू केल्याने त्याचा फायदा होताना दिसत आहे. तालुक्यातील रांजणी हे सुमारे १६५० लोकसंख्येचे गाव. येथील बहुतांशी लोक उदरनिर्वाहासाठी रंगकाम, मातीकामाला व इतर उद्योगासाठी बाहेर गेलेले आहेत. येथील शेती पावसाच्या भरवशावर. पाऊस पडला तर ठिक नाहीतर पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागायची. यंदाही काहीशी अशीच परिस्थिती होती, हे चित्र डोंबिवली ( मुंबई ) येथील नानासाहेब दोलताडे यांच्या मित्रांनी पाहिले. एका कार्यक्रमानिमित्त रांजणी येथे आले होते, त्यावेळी त्यांचे याकडे लक्ष गेले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या गावासाठी काम करण्याचे ठरविले. त्यानंतर काही दिवसांनंतर त्यांनी रांजणीला भेट देऊन गाव दत्तक घेऊन प्रत्यक्षात कामालाही सुरुवात केली. डोंबवली फाउंडेशन व कृषी विभागाच्या वतीने गावात शिसव, गुलमोहर, करंज, सीताफळ, वड अशा हजारो रोपे व बियांचे रोपण नुकतेच करण्यात आले आहे. बंधाऱ्यात नुकत्याच झालेल्या पावसाने पाणीसाठा झाला आहे. त्या पाण्याचे पूजन तहसीलदार सुरेखा माने, तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर, डोंबिवली फाउंडेशनचे अध्यक्ष तुकाराम येळवे, श्यामसुंदर सोन्नर, साहेबराव दिघे, प्रवीण सावंत, सुरेश नायक, सुशील गायकवाड, बप्पा डोंगरे, नानासाहेब दोलताडे, व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले. जलसंधारणामुळे ६५० टीसीएम पाणीसाठाशासनाच्या वतीने ‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत पाणलोट विकास, टंचाई निधीतून या गावात दहा बंधारे बांधण्यात आले. तर बांधबंदिस्ती, सलग समतल चर, ४० हेक्टरवर डीपसीसीटीची कामे करण्यात आली. तर डोंबिवली फाउंडेशनच्या माध्यमातून सुमारे साडेसहा किलोमीटर लांबीचे ओढा रुंदीकरण व सरळीकरण केले. त्यामुळे ओढ्यावरील साखळी सिमेंट बंधाऱ्यात लाखो लिटर पाणीसाठा झाला आहे. या सर्व जलसंधारण कामांमुळे सध्या सुमारे ६५० टीसीएम पाणीसाठा झाला आहे. ‘डोंबिवली फाउंडेशनने येथील दुष्काळग्रस्तांसाठी जे काम केले ते निश्तिच आदर्शवत आहे. त्याच्यबरोबर प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार सुरेखा माने, कृषी अधिकारी राजेश जानकर यांनी रांजणी गावाला जलश्रीमंत करण्यासाठी साथ दिली. त्यामुळे गाव दुष्काळमक्त झाला आहे. - नानासाहेब दोलताडे
रांजणी गाव झाले जलश्रीमंत!
By admin | Published: July 10, 2016 1:02 AM