सातारा : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व माण खटाव विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी करण्यात आलेले ठराव पात्र ठरविण्याचा निर्णय विभागीय सहनिबंधक यांनी घेतला. त्यामुळे रणजित सिंह आणि जयकुमार या दोघांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदारयादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये १९६३ मतदारांची कच्ची यादी जिल्हा बॅंकेने तयार करून ती सहनिबंधक कार्यालयास पाठवली होती. ही यादी प्रसिद्ध करून त्यावर आक्षेप व हरकती मागविल्या होत्या. कच्च्या यादीवर ४६ हरकती दाखल झाल्या होत्या. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधले, ते पाणीपुरवठा संस्थेतील खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या नावाचे ठराव जिल्हा बॅंकेने अपात्र यादीत टाकले होते. त्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली आहे. यावर विभागीय सहनिबंधक काय निर्णय देणार, याची उत्सुकता होती. आज सहनिबंधकांनी हे दोन्ही ठराव पात्र ठरवत मतदारयादीत समाविष्ठ केले आहेत.
कच्च्या मतदार यादीत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचे पाणी पुरवठा मतदारसंघातील ठराव जिल्हा बँकेने अपात्र यादीत टाकले होते. त्यावरून या दोघांनी विभागीय सहनिबंधकांकडे हरकत दाखल केली होती. तसेच विभागीय सहनिबंधक यांच्या निकालानंतर उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी दिला होता. दरम्यान, यादीतील नाव पात्र ठरल्यानंतर सुनावणीवेळी दोघांनीही हरकती नोंदवल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन मंगळवारी विभागीय सहनिबंधकांनी या दोघांचेही ठराव पात्र ठरविले आहेत.
माण, फलटणमध्ये त्वेशाने लढाई
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विरोधकांना रिंगणाबाहेर ठेवण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीने प्रयत्न केले, मात्र ते फोल ठरल्याने आता लढाई निश्चितपणे होणार आहे. माण, फलटण तालुक्यांमध्ये ही लढाई कशाने होईल, असे चित्र सध्या पाहायला मिळते.