सातारा : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे जोरात वाहत असून, यामध्ये माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आले आहे. तरुण चेहरा व पश्चिम महाराष्ट्रात भाजप आणखी बळकट करण्यासाठी म्हणून का होईना रणजितसिंहांना लॉटरी लागू शकते, असे संकेत मिळत आहेत.
संसदेचे अधिवेशन पुढील काही दिवसांत होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे सुरू झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये कोणाला घ्यायचे अन् कोणाला वगळायचे यावरून केंद्रस्तरावर वेगवान घडामोडी सुरू आहेत. महाराष्ट्रातून भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे नाव सर्वात पुढे आहे. त्याचबरोबरीने आता माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेही शर्यतीत आले आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, माढा, सांगोला आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातील मतदार यासाठी मतदान करतात. तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे. १५ वर्षांपूर्वीपर्यंत भाजप पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यांत कमकुवत होती. चाचपडत प्रवास सुरू होता. पण, गेल्या काही वर्षांत पक्षाने मुसंडी मारली. पक्षाचे सध्या सोलापूर, सांगली, माढा, पुणे येथे खासदार आहेत. पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात आणखी बळकट करण्याचा प्रयत्न भाजपचा असून त्यादृष्टीने रणजितसिंहांना लॉटरी लागू शकते.
चौकट :
आश्वासनाचा विचार होणार...
पश्चिम महाराष्ट्रात आजही राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. काँग्रेसही मागोमाग चाललीय. सहकाराच्या पट्ट्यात भाजपला आणखी भक्कम करायचे झाल्यास रणजितसिंहांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. यासाठी राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेतेही अनुकूल राहू शकतात. कारण, लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष असणारे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी हात सोडून कमळ जवळ केले होते. त्यावेळी त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात रणजितसिंहांचे नाव चर्चेत आले आहे.
........................................................