नितीन काळेल ।सातारा : माढा मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा तिढा वाढत असून, भाजपही त्यामुळे शांत आहे. त्यातच आता मतदार संघातील राजकीय मोठे घराणे असलेले व विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह हे भाजपमध्ये जाण्याचे जवळपास निश्चित आहे. असे झाले तर मतदार संघातील राष्ट्रवादीची ‘घडी’ विस्कटून पक्षाला हा मोठा धक्का बसू शकतो.
दहा वर्षांपूर्वी माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील चार आणि सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. तसं पाहायला गेले तर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचीच ताकद अधिक आहे. आघाडीचा विचार केला तर ही ताकद अधिक वाढते. त्यामुळेच सलग दोनवेळा येथून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. त्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे. त्यामुळे माढा म्हटले की राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हे समीकरण बनू लागले; पण सध्या याला कुठेतरी तडा जाणार का? अशी भीती आहे. याला कारण म्हणजे सध्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून सुरू असणारा तिढा व नाराज असणारे खासदार मोहिते-पाटील व त्यांचे सुपुत्र रणजिसिंह यांच्यामुळे. माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची? यावरून पक्षात चांगलीच खलबते झाली. कधी विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव समोर यायचे तर कधी त्यांचे सुपुत्र रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचे यायचे. तर मधूनच सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नाव पुढे आले; पण एकमत होत नव्हते. त्यातच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजप मंत्र्यांची भेट घेतली. परिणामी त्यांच्याबद्दल राष्ट्रवादीमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे रणजितसिंह यांना उमेदवारी देताना राष्ट्रवादीत नाराजीच होती. त्याचाच परिणाम म्हणून ते भाजपच्या गळाला लागल्याचे निश्चित झाले आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यास रणजितसिंह मोहिते-पाटील हेच माढा लोकसभेचे उमेदवार राहतील, असे दिसते. जरी त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर त्यांच्या येण्याने भाजपच्या उमेदवाराची ताकद नक्कीच वाढणार आहे. तर रणजितसिंह यांना भाजपकडून विधान परिषद, राज्यसभेवर जाण्याची संधी मिळू शकते. एकमात्र, राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का असणार आहे.भाजपचा कावेबाजपणा...भाजप कावेबाजपणे पावले टाकत आहे. राष्ट्रवादी कोणाला उभे करते. त्यावरच भाजप निर्णय घेणार आहे. भाजपचा उमेदवार कदाचित राष्ट्रवादीतून येणारा कोणी असू शकतो, कोणी भाजपचा निष्ठावंत असेल नाहीतर भाजपच्या पाठबळावर पदाधिकारी झालेला एखादा असेल; पण हे सर्व राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.