सातारा : जिल्ह्यात आज, बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तब्बल ७३४ लोक कोरोना बाधित आढळले आहेत. कोरोना रुग्णवाढीचा दर सोळा टक्क्यांच्या पुढे गेला असून मंगळवारच्या तुलनेत दुपटीने रुग्ण वाढ झाल्याचे समोर आले आहे. यामुळे सातारकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यावर भर दिला आहे. मंगळवारी ४ हजार ५५९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यामधून ७३४ लोक कोरोना बाधित आढळले. सोमवारी केलेल्या चाचण्यांमधून ३७८ लोक बाधित आढळले होते, त्याच्या तुलनेमध्ये दुपटीने रुग्ण वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्ण वाढीचा दर १६.१० टक्क्यांवर पोहोचला असल्यामुळे चिंतेचे सावट पसरले आहे.दरम्यान, जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे प्रशासनाने काही प्रमाणात निर्बंध लागू केले आहेत. रुग्ण वाढीचा दर चिंतेत टाकणारा असल्यामुळे जिल्ह्यामध्ये नवीन निर्बंध लागू शकतात. जिल्हा प्रशासनाने लसीकरण न केलेल्या लोकांना लस घेण्याबाबत आवाहन करण्यात येत होते.व्यापारी, दुकानदार, विक्रेते तसेच त्यांच्याकडे काम करायला असलेले कामगार यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. अशा व्यावसायिकांवर बुधवारपासून दंडात्मक कारवाईला प्रशासनाने सुरुवात केली आहे. तसेच वेळोवेळी दंड करून देखील जर हे लोक ऐकत नसतील तर त्यांचे व्यवसाय बंद ठेवावे लागणार आहेत.
चिंताजनक! जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, ७३४ जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 2:02 PM