लोकमत न्यूज नेटवर्क
कोयनानगर : कोयना अभयारण्य तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दुर्मीळ श्रीलंकन फ्रॉग माउथ (बेडूक तोंड्या) पक्षी स्थानिक पक्षी निरीक्षकांना आढळून आला आहे. त्यामुळे पक्षिप्रेमी सुखावले आहेत.
कोयना परिसरात स्थानिक युवकांनी एकत्र येऊन डिस्कव्हर कोयना आणि सह्याद्री सोशल फाउंडेशन संस्थेमार्फत संशोधन, निरीक्षण, अभ्यास सुरू केला आहे. त्या माध्यमातून वेगवेगळ्या वन्यजीवांच्या नोंदी त्यांनी केल्या आहेत. संस्थेच्या सदस्यांना नुकताच दुर्मीळ श्रीलंकन फ्रॉग माउथ (बेडूक तोंड्या) हा पक्षी सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या कोयना परिसरामध्ये आढळून आला. सदस्य पक्षिमित्र संग्राम कांबळे, निखिल मोहिते, नरेश शेलार, संकेत मोहिते, महेश शेलार हे गत दीड ते दोन वर्षांपासून अनोळखी पक्ष्याचा आवाज ऐकत होते. पक्षी अभ्यासातील सातत्य आणि निरीक्षण असल्याने संग्राम यांनी हा आवाज ‘श्रीलंकन फ्राॅग माउथ’ या पक्ष्याचा असल्याचा अंदाज बांधला. मात्र, त्याचा फोटो उपलब्ध होत नव्हता. गेली दीड वर्षापासून ते त्यासाठी प्रयत्न करीत होते. अशातच पावसाळी वृक्षारोपणासाठी मागवलेली रोपे संध्याकाळच्या वेळी उतरवून ठेवताना तो आवाज ऐकू आला. आणि पक्ष्यांच्या यादीमध्ये नवीन प्रजातीची नोंद करायचीच या हेतूने संग्राम, निखिल आजूबाजूला शोध घेऊ लागले. अथक परिश्रमाने संग्राम आणि निखिल यांच्या कॅमेऱ्यामध्ये अखेर दुर्मीळ श्रीलंकन फ्रॉग माउथचा फोटो कैद झाला. त्यांच्या दीड वर्षापासूनच्या परिश्रमाला यश आले.
श्रीलंकन फ्रॉग माउथचा अधिवास कोयना अभयारण्य क्षेत्रात असणे, ही पक्षिमित्रांसाठी आनंदाची बाब आहे. भविष्यात कोयना भागातील वन पर्यटन नक्कीच जागतिक दर्जाचे होईल, असे डिस्कव्हर कोयना आणि सह्याद्री सोशल फाउंडेशन संस्थेमधील संग्राम कांबळे, निखिल मोहिते, महेश शेलार, संकेत मोहिते, नरेश शेलार, सागर जाधव, क्षितिज कांबळे, स्वप्नील पाटील, कृणाल कांबळे या सदस्यांनी सांगितले.
- चौकट
दुर्मीळ ‘श्रीलंकन फ्रॉग माउथ’ची वैशिष्ट्ये...
१) हा पक्षी निशाचर असून, तो दिवसा घनदाट जंगलात विश्रांती घेत असतो.
२) साधारणपणे याच्या शरीराची लांबी २२ ते २३ सेंटीमीटर असते. कीटक हे त्याचे आवडते खाद्य आहे.
३) नर पक्ष्याचा संपूर्ण शरीराचा रंग हा वाळलेल्या लाकडाच्या सालीसारखा राखाडी असतो.
४) मादी ही बदामी रंगाची असते. पंखाच्या बाजूने व पाठीमागे बदामी रंगावर पांढरे ठिपके असतात.
५) बेडकाच्या तोंडासारखे तोंड असल्याने त्याला मराठीत मण्डूक मुखी (बेडूक तोंड्या) असेही म्हणतात.
- चौकट
दुर्मीळ फुलपाखरू, राजकपोत पक्ष्याचीही नोंद..
कोरोनामुळे मानवी वर्दळ कमी व परिसरात शांतता असल्याने वातावरणातील कमालीचा बदल अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये अतिशय दुर्मीळ असलेल्या वन्यजीवांचा मुक्त संचार चालू असल्याचे जाणवत आहे. यापूर्वी युवकांच्या या टीमने केरळ राज्याचे राज्य फुलपाखरू ‘मलबार ब्रॅण्डेड पिकॉक’ याचे वास्तव्य तसेच अतिशय दुर्मीळ असे ‘राजकपोत’ या पक्ष्याचीही नोंद केली होती.
फोटो :
कॅप्शन : कोयना प्रकल्पात आढळलेला दुर्मीळ ‘श्रीलंकन फ्रॉग माउथ’ पक्षी.