चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील गमेवाडी येथे रविवारी दुर्मीळ ट्री फ्राॅग बेडूक आढळला. येथील रहिवासी संग्राम दादासाहेब यादव यांनी त्याला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. दुर्मीळ असा बेडूक सापडल्याचे समजताच परिसरातील लोकांनी एकच गर्दी केली होती.
गमेवाडी येथील संग्राम दादासाहेब यादव यांना घरासमोरील अंगणात हा बेडूक आढळला. सतत टक् टक् आवाज करणारा हा बेडूक आकाराने लहान आहे. त्याची लांबी चार इंच असून, बोटे टोकाला गोलाकार आहेत. हा बेडूक झाडावरही वास्तव्य करु शकतो. म्हणून त्याला कोकणात झाडबेडूक नावाने ओळखतात. तर पाँलिपेडस मँक्युलेटस या शास्त्रीय नावानेदेखील त्याची ओळख आहे. पानथळी अथवा पाण्याच्या डबक्याजवळच्या झाडाच्या फांद्यांवर मादी बेडूक अंडी घालत असते. पूर्ण वाढ झाल्यावर बेडूकमासे पाण्यात पडतात. झाडे, भिंती, दरवाजे यांना सहजपणे चिकटू शकेल, असा हा बेडूक सुरुवातीला कालिकतमध्ये आढळला होता. सध्या हा जीव कोकणात सगळेकडे पाहावयास मिळत आहे.
दिसायला देखण्या व आकर्षक अशा या बेडकाचे गमेवाडी येथे संग्राम यादव यांना सर्वप्रथम दर्शन झाले. यादव यांनी त्याला थोड्या वेळासाठी थांबवत मोबाईलमध्ये कैद केले. परिसरातील समाज माध्यमांवर या सोन्या बेडकाचा फोटो व्हायरल होताच अनेकांनी गमेवाडीकडे धाव घेतली. शेवटी यादव यांनी या सोन्या बेडकाला सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. काही काळ या बेडकाला पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी गर्दी केली होती.
चौकट :
कोकणात सगळीकडे आढळणारा हा बेडूक कोमन इंडियन ट्री फ्राॅग अथवा चुमन फ्राॅग या नावानेही परिचित आहे. झाडावर व जमिनीवर हा बेडूक वास्तव्य करतो. दिसायला आकर्षक व टक् टक् असा आवाज काढत सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतो.
- डॉ. सुधीर कुंभार
पर्यावरण अभ्यासक, कऱ्हाड
फोटो २४ चाफळ
चाफळ विभागातील गमेवाडीत दुर्मीळ ट्री फॉग बेडूक आढळला.