वरकुटे-मलवडी : दुष्काळी आणि डोंगराळ भागातील विरळी (ता. माण) येथील विरळीतील धुळा विष्णू गोरड यांनी लग्न झाल्यावर तत्काळ नववधू व वऱ्हाडी मंडळींसह धुळोबा मंदिरासमोरील परिसरात वृक्षारोपण करून निसर्गाचा आशीर्वाद घेऊन नवीन पिढीला वेगळाच आदर्श घालून दिला. त्याबद्दल परिसरातून वधुवरांचे कौतुक होत आहे.
कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात घेऊन, कायम दुष्काळ व पाणीटंचाईच्या माण तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागात असणाऱ्या विरळी गावचा परिसर भरपूर झाडे लावून हिरवागार करण्याचा मानस उराशी बाळगून, गावातील नागरिकांच्या प्रत्येक मंगलकार्यानिमित्त झाडे लावण्याची व जोपासण्याची मोहीम सरपंच प्रशांत गोरड यांनी सुरू केली आहे. बागलवाडी येथील धुळोबा मंदिराच्या सभोवताली १५० वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून सुंदर प्रकारचे गार्डन तयार करणार असल्याची माहिती सरपंच प्रशांत गोरड यांनी दिली. याची सुरुवात बागलवाडी येथील धुळा गोरड व तेजस्विनी गोरड या नवदाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपस्थित विरळी ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व सदस्य, मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
१५वरकुटे मलवडी
फोटो : विरळी बागलवाडीतील मंदिरासमोर नवदाम्पत्याने वृक्षांची लागवड केली.