सातारा : महाविकास आघाडीतून माढा रणांगणात उतरण्याच्या तयारीतील रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवार यांना धक्का देत महायुतीला पुन्हा जवळ केलं आहे. त्यामुळे माढाची निवडणूक आता भाजप आणि पवार यांच्या राष्ट्रवादीतच होण्याचे स्पष्ट झाले आहे. आता महायुतीतील कोणी पवार यांच्या गळाला लागणार, यावरच माढ्याचा संघर्षही ठरणार आहे.माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आताची चाैथी निवडणूक होत आहे. पण, ही निवडणूक इतर तीनपेक्षा वेगळी ठरलीय. तरीही अजून या मतदारसंघातील चित्र स्पष्ट झालेले नाही. भाजपने आठवड्यापूर्वीच विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली. पण, त्यांनाही अडविण्याचे प्रयत्न संपलेले नाहीत. महायुतीतील रामराजे नाईक-निंबाळकर आणि अकलुजचे माेहिते-पाटील यांचा विरोध तसूभरही कमी झालेला नाही.तर दुसरीकडे महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे मतदारसंघ आहे. त्यांचाही उमेदवार ठरता-ठरेना. रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर हे आघाडीतून माढा निवडणूक लढविणार होते. शरद पवार यांच्याबरोबर त्यांची सकारात्मक चर्चाही झालेली. फक्त घोषणा होणे बाकी होते. अशातच जानकर यांनी पवार यांना राजकीय धक्का दिला आहे.महादेव जानकर हे महायुतीतच होते. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच ते माढ्याच्या तयारीत होते. निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केलेली. तसेच त्यांनी महाविकास आघाडीबरोबर जाण्याबाबतही तयारी करुन ठेवलेली. याचदरम्यान, महायुतीशीही आतून संधान साधून असल्याची माहितीही समोर येत होती. तरीही त्यांचा कल अधिक करुन आघाडीकडेच होता. पण, जानकर यांची उपयुक्तता ओळखून महायुतीने त्यांना पुन्हा खेचले. तसेच लोकसभेचा एक मतदारसंघ देण्याचेही जाहीर केले. यामुळे जानकर युतीबरोबर गेल्याने शरद पवार यांना धक्काच बसलाय. कारण, दोनवेळा भेट घेऊनही जानकर यांनी पत्ता पलटला आहे. आता पवार यांना माढ्यासाठी दमदार उमेदवार देण्यासाठी डावपेच आखावे लागतील.
माढा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ असून त्याचे सर्व आमदार हे युतीतच आहेत. राष्ट्रवादीचे तीन आमदार असलेतरी ते अजित पवार यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे माढ्यासाठी पवार यांच्याकडे खमक्या उमेदवार नाही हे वास्तव आहे. त्यातच महादेव जानकर यांनीही युतीला जवळ केले. अशावेळी खासदार रणजितसिंह यांच्या उमेदवारीवर नाराज असणारे महायुतीतील कोणी गळाला लागते का ? यावरच पवार यांचे लक्ष आहे. मोहिते-पाटील किंवा रामराजे यांच्या कुटुंबातील कोणी बरोबर आले तर पवार हे तुल्यबळ लढत घडवू शकतात. यासाठी आणखी काही दिवस थांबण्याचीही त्यांची तयारी असू शकते. पण, आता माढ्याचा सामना हा भाजप आणि पवार यांच्या राष्ट्रवादीतच होणार हे स्पष्ट झालेले आहे.आघाडीतून तीन जागांची मागणी; एकच मिळणार होती..
महादेव जानकर यांनी आघाडीतून माढा, सांगली आणि परभणी मतदारसंघाची मागणी केली होती. पण, माढा मतदारसंघ हा शरद पवार यांच्याकडे होता. त्यामुळे त्यांनी माढ्याची जागा देण्यासाठी जानकर यांना आश्वस्त केलेले. पण, सांगली काॅंग्रेसकडे आणि परभणी शिवसेना ठाकरे गटाकडे होती. त्यामुळे जानकर यांची ही मागणी पूर्ण होणे अशक्यच होते. परिणामी त्यांनी फायद्याचा विचार करुन महायुतीतच थांबणे पसंद केले असावे.
जानकर परभणी की बारामतीतून लढणार ?
महादेव जानकर आतापर्यंत भाजपच्या सहकार्यातून आमदार आणि मंत्रीही झाले आहेत. २०१४ ला त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवून खासदार सुप्रिया सुळे यांना मोठे आव्हान दिले होते. आता महायुतीतून रासपला एक मतदारसंघ देण्यात येणार आहे. माढा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट आहे. परभणीची त्यांची मागणी मान्य होऊ शकते. तसेच युतीतील नेते त्यांना बारामतीतूनही पुन्हा उभे राहण्याची गळ घालू शकतात. परभणी मतदारसंघ मिळाला तर ते स्वत: की एखाद्या कार्यकर्त्याला उभे करणार हेही लवकरच स्पष्ट होणार आहे.