कुडाळ : कुडाळ परिसरातील रब्बीच्या हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. गतवर्षी ज्वारीच्या कडब्याला शंभर पेंड्यांना दोन ते अडीच हजार रुपये मिळणारा दर यंदा मात्र हजार, बाराशे रुपयापर्यंत खाली आला आहे. अजूनही शेतकऱ्यांचा कडबा शेतात असून, दराअभावी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सगळेच व्यवसाय ठप्प आहेत. यातून शेती व्यवसायही सुटला नाही. नगदी पिकांबरोबरच जिरायती पिकांनाही याचा फटका बसला. ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे उत्पादन चांगले होऊनही दराअभावी शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. ज्वारीच्या कडब्याच्या दरवर्षी साधारपणे दोन ते अडीच हजार रुपये दर मिळत होता. या वर्षी मात्र तो हजार ते बाराशेच्या रुपयांच्या आसपास आहे.
मुळातच ज्वारीच्या पिकांसाठी होणारी मेहनत आणि यातून मिळणारे उत्पन्न पाहता शेतकऱ्यांना फारसे काही मिळत नाही. दरवर्षीपेक्षा यंदा मात्र काढणी, मळणी याचा विचार करता दरही वाढलेले होते. अशातच अवकाळी पावसाने कडब्याचे नुकसानही झाले. शेवटी दराअभावी मिळेल त्या दरात ग्राहकांची विनवणी करून शेतकरी कडबा विकत आहेत. यामुळे उत्पन्न वाढूनही शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.