सातारा : सातारा वीजवितरण कंपनीच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या संजय बडेकर (रा. शाहूपुरी, सातारा) यांना आनेवाडी टोलनाक्यावर एक मोबाईल सापडला. मोबाईल जवळ बाळगण्यापेक्षा ज्याचा मोबाईल आहे. त्याला परत करावा. परंतु पोलिसांत गेल्यास त्यांचा ससेमिरा मागे लागेल, यामुळे मोबाईल ‘लोकमत’ कार्यालयात जमा केल्यास संबंधित व्यक्तीला तो मोबाईल खात्रीशीर मिळेल, असा ठाम विश्वास असल्यामुळेच बडेकर यांनी ‘लोकमत’ च्या माध्यमातून मूळ मालकाच्या हातात तो मोबाईल स्वाधीन केला.संजय बडेकर (रा. शाहूपुरी, सातारा) हे दि. ६ रोजी सकाळी आपल्या मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी आनेवाडी टोलक्यापासून पुढे गेल्यानंतर ते रस्त्याकडेला थांबले होते. यावेळी त्यांना एक मोबाईल दिसला. तो मोबाईल त्यांनी स्वत:जवळ ठेवला. काहीवेळानंतर त्या मोबाईलवर फोन आला. त्यानंतर बडेकर यांनी तुमचा मोबाईल मला सापडला आहे. तुमची ओळख पटवून तुम्ही घेऊन जावा, असे त्या पलिकडच्या व्यक्तीला सांगितले. त्या व्यक्तीने आपले नाव सागर कल्लाप्पा वाघमारे (रा. ममपाडळी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) असे सांगितले.हा मोबाईल पोलिसांच्या हातात दिला तर अनेक प्रश्न आणि त्यांचा ससेमिरा नको म्हणून बडेकर यांनी हा मोबाईल ‘लोकमत’ कार्यालयात आणून दिला. यावेळी कोल्हापूरहून आलेले मोबाईलचे मालक सागर वाघमारे यांच्या हातात बडेकर यांनी मोबाईल दिला. ‘लोकमत’च्या माध्यमातून वाघमारे यांना मोबाईल मिळाल्याने वाघमारे यांचे डोळे पानावले. या जगात बडेकर यांच्या रूपाने अद्यापही माणुसकी टिकून आहे, असे यावेळी वाघमारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पोलिसांत जाण्याऐवजी ‘लोकमत’वर विश्वास
By admin | Published: January 07, 2016 10:42 PM