लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : रेशनिंगचे धान्य हा प्रत्येक लाभार्थ्याचा हक्क; पण हा हक्क मिळवताना लाभार्थ्याने कोरोना चाचणी करावी, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. ‘टेस्टिंग’ वाढविण्यासाठी प्रशासनाने निवडलेल्या अनेक पर्यायांमधील हा एक पर्याय असून, चाचणी सक्तीची नसली तरी गरजेची असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वेग अद्याप कमी झालेला नाही. त्यातच कऱ्हाडसह अन्य काही तालुक्यांमध्ये दररोज रुग्णवाढ होत आहे. कोरोनामुक्तीचा दर जास्त असला तरी दररोजच्या बाधितांची संख्या पाचशे ते हजारपर्यंत आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी चाचण्या वाढविणे गरजेचे असून, प्रशासनाने त्यासाठी विविध पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांचीही आरोग्य विभागाकडून सक्तीने चाचणी केली जात आहे. समूहात वावरणारा बाधित रुग्ण आढळल्यास त्याला ‘आयसोलेट’ करून संक्रमणाची पुढील साखळी रोखण्याचा या चाचण्यांमागचा उद्देश आहे. त्यातच आता रेशनिंगचे धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यानेही कोरोना चाचणी करावी, असे सांगण्यात आले आहे.
रेशनिंग धान्यासाठीची ही चाचणी सक्तीची नसली तरी संक्रमण रोखण्यासाठी गरजेची आहे. गावोगावी लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्या प्रत्येकाची चाचणी झाल्यास संक्रमणाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
- चौकट
लाभार्थी वंचित राहणार नाही!
रेशनिंग घेण्यापूर्वी लाभार्थ्याने कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे, मात्र बंधनकारक नाही. चाचणी केली नसली तरी त्या लाभार्थ्याला धान्य नाकारू नये, अशी सूचनाही प्रशासनाने रेशनिंग वितरकांना दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये, अशी प्रशासनाची भूमिका आहे.
- चौकट
कऱ्हाड तालुका...
७८,००० : लाभार्थी
२८५ : दुकानदार
- चौकट
... असा मिळतो लाभ
- अन्न सुरक्षा योजना
नियमित प्रतिव्यक्ती
३ किलो गहू
२ किलो तांदूळ
अंत्योदय लाभार्थी प्रतिकुटुंब
२५ किलो गहू
१० किलो तांदूळ
- गरीब कल्याण योजना
लाभार्थी प्रतिव्यक्ती
३ किलो गहू
२ किलो तांदूळ
अंत्योदय प्रतिव्यक्ती
३ किलो गहू
२ किलो तांदूळ
- चौकट
अंगठाही नको, नियम पाळा!
धान्य वितरणावेळी लाभार्थ्यांना ‘थम्ब’ करावे लागते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्याचा अंगठा घेणे बंद करण्यात आले आहे. दुकानदारांच्या अंगठ्यावरच लाभार्थ्यांना धान्य दिले जात असून, धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांनी कोरोनाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करावे. सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, मास्क वापरावा, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.
फोटो : १६ केआरडी ०२
कॅप्शन : प्रतिकात्मक