सातारा : काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील दोघांकडून जप्त केलेले पिस्टल रत्नागिरीतील एका पोलिस उपनिरीक्षकाचे असल्याचे तपासात उघड झाले. संबंधित दोघांना रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
श्रीधर ज्ञानदेव कुंभार (रा. गडकरआळी, सातारा), स्वयंभू मेघराज शिंदे (रा. वाई) अशी ताब्यात देण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत.आनेवाडी टोलनाक्यावर स्थानिक गुन्हे शाखेने दि. ९ डिसेंबर रोजी श्रीधर व स्वयंभूला अटक केली होती.
यावेळी त्यांच्याकडून एक पिस्टल व रिकामी पुंगळी जप्त केली होती. हे पिस्टल त्यांच्याकडे कोठून आले. याबाबत पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
संबंधित दोघे युवक २०१५ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या पोलिस भरतीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी एका पोलिस उपनिरीक्षकाची बॅग चोरली होती. त्या बॅगमध्ये एक पिस्टल आणि दहा जीवंत काडतुसे होती. त्यापैकी काही काडतुसे त्यांनी ते राहात असलेल्या परिसरामध्ये फायर करून नष्ट केली.
स्थानिक गुन्हे शाखेने रत्नागिरी येथील पोलिसांशी संपर्क साधला असता रत्नागिरी पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक भिमराव पाटील (लांजा पोलिस ठाणे) यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी याबाबत पिस्टल चोरीला गेल्याची तक्रारही पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान, या श्रीधर आणि स्वयंभू या दोघांना अधिक तपासासाठी शुक्रवारी रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.