सातारा : कोरोनानंतर अडखळत सुरू झालेल्या एस. टी.ने काही दिवसात सर्व संकटे विसरुन प्रवासी सेवेसाठी धावण्यास सुरुवात केली आहे. रात्रभर प्रवास केल्यास पुणे, मुंबईत दुसऱ्या दिवशी दिवसभरात कामे करुन परत रात्री आपल्या गावी जाता येते. त्यामुळे अनेकांना दिवसापेक्षा रात्रीचा प्रवास सोयीचा वाटतो. ही गरजही एस. टी.ने पूर्ण केली आहे. त्यामुळे एस. टी.च्या रातराणी गाड्या सुसाट धावत आहेत.
साताऱ्यातील अनेक लहान-मोठे व्यापारी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला जात असतात. त्यांना रात्रभर प्रवास करुन सकाळी मुंबईत गेले तर दिवसभर खरेदीच्या कामानिमित्ताने फिरता येते, वेळ देता येतो. त्याचप्रमाणे काही नोकरदार, शिक्षणासाठी मुंबईत राहणारे सुटीला गावी येतात. तेव्हा तेही रात्रभर प्रवास करुन सकाळी घरी जाऊन त्यांना पुन्हा कामावर जाता येते. साहजिकच रातराणी गाडीला सातारकरांमधून चांगली मागणी होती. एस. टी.ने रातराणी गाड्या सुरू केलेल्या असल्याने तीही मागणी आता पूर्ण झाली आहे.
सातारा विभागातील सातारा - मुंबई सेट्रल ही मेगा हायवेवरुन धावणारी गाडी रात्री साडेदहाला आहे तर सांगली विभागाची जत - परेल ही गाडी मध्यरात्री साडेबारा वाजता सातारा मध्यवर्ती बसस्थानकात येते. त्यामुळे सातारकरांची चांगलीच सोय झाली आहे.
चौकट
एस. टी.च्या सुरू असलेल्या रातराणी
कोल्हापूर - बोईसर
मेढा - नाशिक
कलेढोण - परेल
वडूज - मुंबई
जत - परेल
सातारा - मुंबई
चौकट
कोल्हापूर - बोईसरला स्लिपर कोच
सातारा विभाग हे पुणे, कोल्हापूर या दोन महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाणी येते. या ठिकाणाहून सर्वच ठिकाणे कमी अंतरात आहेत. त्यामुळे शयनयान गाड्यांची सातारकरांना फारशी गरज नसते. मात्र, कोणाला शयनयान गाडीतून प्रवास करायचाच असेल तर त्यांच्यासाठी कोल्हापूर - बोईसर या गाडीचा पर्याय आहे. ही गाडी कोल्हापूर विभागाची असली तरी या गाडीतून सातारकरांना आरामदायी प्रवास करता येतो.
चौकट
एस. टी.पेक्षा तिकीट जास्त
साताऱ्यातून मुंबईला जाण्यासाठी शिवशाही गाडीला केव्हाही प्रवास केला तरी ५४० रुपये तिकीट दर आहे. तर हिरकणीने गेल्यास रात्री साडेपाचशे रुपये तिकीट आकारले जाते. याउलट खासगी प्रवासी बसला साडेआठशे रुपये आकारले जातात. तसेच या गाड्यांसाठी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा, शिवराज पेट्रोल पंप याठिकाणी जावे लागते. रात्रीचा प्रवास असल्यास तेथेपर्यंत जाण्यास रिक्षा मिळत नाही किंवा मिळाल्या तरी अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते.