सातारा : गेले काही दिवस प्राथमिक मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू होते. आता जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी धनंजय डोईफोडे यांनी अधिसूचनेनुसार ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. १२ ते २२ एप्रिलदरम्यान या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप व हरकत दाखल करता येणार आहे. ३ मे रोजी हरकती व आक्षेप यांच्यावर निर्णय घेतला जाणार असून ६ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढी मिळाल्या आहेत. मात्र कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात काही सभासद न्यायालयात गेले होते. त्यामुळे न्यायालयाने ही निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. या मतदार यादीवर कोण, काय आक्षेप घेतोय, याबाबत उत्सुकता आहे. त्याबरोबरच आता प्रचाराला सुद्धा अधिक गती येईल यात शंका नाही.