कऱ्हाड : येथील अशाकिरण महिला वसतिगृहातील निराधार म्हणून वावरत असणाऱ्या प्रियांकाला संदीप लक्ष्मण तोडकर या मुंबई येथील युवकाने आपल्या आयुष्याची जोडीदार म्हणून निवडून कायमचा आधार देत, तिला हक्काचे घर मिळवून दिले आह़े गुरुवारी येथील वसतिगृहाच्या आवारात हिंदू रितीरिवाजानुसार प्रियांका व संदीप यांचा पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा झाला़ नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते़ संदीप तोडकर यांनी निर्माण केलेल्या सामाजिक आदर्शाचे सर्वत्र कौतुक होत आहे़ राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत कऱ्हाड येथे निराधार महिलांसाठी आशाकिरण वसतिगृहाचा उपक्रम राबविला जातो़ या वसतिगृहात समाजातील निराधार महिला व मुली वास्तव्य करतात़ कुर्ला, मुंबई येथील संदीप लक्ष्मण तोडकर व त्यांच्या कुटुंबीयांना संदीपचा विवाह समाजातील निराधार मुलीशी करून तिला हक्काचं घर मिळवून देण्याची मनोमन इच्छा होती़ यासाठी त्यांनी येथील आशाकिरण वसतिगृहाच्या अधीक्षिका ज्योत्स्रा कापडे यांच्याशी संपर्क साधला होता़ वसतिगृहात राहणारी प्रियांका विवाहयोग्य असल्याने तिच्यासमोर तोडकर कुटुंबीयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता़ प्रियांकाने याला संमती दिल्याने पुढील चर्चेतून संदीप व प्रियांका यांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार गुरुवारी दुपारी १ वाजून ११ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर वसतिगृहाच्या आवारात संदीप व प्रियांका यांचा विवाह सोहळा झाला़ यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी रोहिणी ढवळे, नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, माजी नगराध्यक्षा उमा हिंगमिरे, प्रांताधिकारी किशोर पवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्यासह कऱ्हाड शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद देऊन त्यांच्या नवजीवनास सदिच्छा दिली़ राज्य शासनाच्या वतीने या विवाह सोहळ्याचा सर्व खर्च करून नवदाम्पत्यास संसारोपयोगी साहित्याचा संच तसेच ५० हजारांचे रोख अनुदान मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले़ (प्रतिनिधी)
अनाथ प्रियांकाला सापडला आशेचा किरण
By admin | Published: October 31, 2014 12:47 AM