सातारा : काळाची पावले ओळखून त्यापुढे चालण्याची परंपरा रयत शिक्षण संस्थेने जपली आहे. जगभरात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा सुरू असलेला वापर आणि त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ याचा विचार करता रयत शिक्षण संस्थेने आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करावा, अशी अपेक्षा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.
सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात लोकनेते रामशेठ ठाकूर भवन उद्घाटन आणि इस्माइलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रयतचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हाइस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, रयत मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर, सचिव विठ्ठल शिवणकर, खासदार श्रीनिवास पाटील, सहसचिव प्राचार्य डॉक्टर प्रतिभा गायकवाड उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, सामान्यांना शिक्षण देऊन त्यांच्या उन्नतीत महत्त्वपूर्ण घटक होण्याचे श्रेय रयत शिक्षण संस्थेला जाते. काळाची पावले ओळखून रयतने नवनवीन अभ्यासक्रमांचा स्वीकार करून राष्ट्रीय पातळीवरही कौतुकास्पद काम केले आहे. सत्तर कोटी रुपयांहून अधिकची देणगी देण्याचे ठाकूर यांनी दाखवलेले दातृत्व अतुलनीय आहे. रयतच्या वाटचालीत या दातृत्वाचा फार मोठा वाटा राहिला आहे.
गृहमंत्री वळसे पाटील यांची अनुपस्थितीगृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. मात्र मतदारसंघातील नियोजित कार्यक्रम आणि महत्त्वाच्या बैठकांमुळे वळसे पाटील कार्यक्रमास उपस्थित राहिले नाही.