प्रमोद सुकरे कऱ्हाड: अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. तिरंगी लढतीत अपेक्षेप्रमाणे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी बाजी मारली.त्यांनी भाजपचे आमदार मनोज घोरपडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या दोन स्वतंत्र पॅनेलचा पराभव केला.या निवडणुकीदरम्यान आरोप - प्रत्यारोपांच्या बऱ्याच फैरी झडल्या. पण आता विजयाचा गुलाल खाली बसतो न बसतो तोच पुन्हा आव्हान प्रतिआव्हान सुरू झाले आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील राजकीय वातावरण गरमागरमच दिसत आहे.दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला सहकारी साखर कारखाना म्हणजे सह्याद्री सहकारी साखर कारखाना होय. या कारखान्यावर स्थापनेपासून पी.डी. पाटील व पुढे त्यांचे पुत्र माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचीच सत्ता राहिली आहे. कारखान्याच्या गत ३ निवडणुका तर बाळासाहेब पाटील यांना बिनविरोध करण्यात यश आले होते.यंदा मात्र विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर चा निकाल फिरला तसे कारखाना निवडणुकीसाठीचे रंग बदलले.सुरुवातीला एकास एक लढत होईल असे बोलले जात होते. मात्र विधानसभेला एकत्रित राहिलेल्या विरोधकांच्यातच फूट पडली. भाजपचे आमदार मनोज घोरपडे व भाजपचे जिल्हा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचीच दोन पॅनेल रिंगणात उतरली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. तरी देखील सगळ्यांनीच प्रचाराचा जोर लावला होता.मतदार गाठीभेटी, प्रचार सभा रंगत होत्या अन् त्यातून कारखान्याच्या संदर्भातून अनेक मुद्दे उपस्थित करत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्यामुळे सभासदांचे प्रबोधन अन् इतरांचे चांगलेच मनोरंजनही झाले. निकालानंतर मात्र सत्ताधाऱ्यांनी बॅलेट पेपर वर निवडणूक झाली याचा आनंद आहे. असे म्हणत जणू 'ईव्हीएम' मशीनच्या माध्यमातून जिंकलेल्या विधानसभा निवडणूक निकालावर बोट ठेवले. हाच धागा पकडून राज्यातील महाविकास आघाडीचे काही नेते पुन्हा 'बॅलेट पेपर' चा मुद्दा पुढे करीत सगळ्या निवडणूका बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजेत अशी मागणी करू लाघले आहेत. त्यामुळे आव्हान प्रति आव्हान सुरू झाली आहेत. आमदार घोरपडेंनी देखील त्यांना प्रतिआव्हान दिले आहे.
मतपत्रिकेवर निवडणूक झाली याचा आनंद - बाळासाहेब पाटीलमतपत्रिकेवर निवडणूक झाली याचा आपल्याला आनंद आहे. आपण त्यावर फार बोलू शकत नाही.मात्र राज ठाकरे यांचे भाषण आपण सगळ्यांनी ऐकले आहे. त्यांनी मांडलेली ईव्हीएम संदर्भातली भूमिका आपल्याला माहित आहे असे म्हणत बाळासाहेब पाटील यांनी ईव्हीएम वर झालेल्या विधानसभा निवडणूक निकालावर जणू बोट ठेवले. तोच धागा पकडत कार्यकर्तेही 'ईव्हीएम' मुळेच ते त्यावेळी जिंकले असा दावा करीत आहेत. अप्रत्यक्षपणे बॅलेट पेपरवर मतदान घेऊन घोरपडेंनी निवडून येऊन दाखवावे असे आव्हान दिले जात आहे.
पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊया - मनोज घोरपडेबॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या की आम्ही जिंकतो असे चित्र आघाडीचे नेते तयार करीत आहेत. पण सह्याद्रीच्या सत्ताधाऱ्यांनी वारस नोंदी रखडवून ठेवून सुमारे ९ हजार सभासदांना मतदानापासून वंचित ठेवले. त्यांनी त्यांना त्वरीत सभासद करून घ्यावे, पुन्हा कारखान्याची निवडणूक लावावी म्हणजे काय निकाल येतोय हे समोर येईल. त्यानंतर मी पण आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. पुन्हा निवडणुकीला दोघेही सामोरे जाऊया. मग निकाल बदलतोय का ? तेही लक्षात येईल असे जाहीर आव्हान आमदार मनोज घोरपडे यांनी दिले आहे.