सातारा : साताऱ्यातील जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या बैठकीत सदस्यांकडून तक्रारींचाच पाढा वाचण्यात आला. यामुळे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार कामाबाबत सूचना करावी लागली. तसेच याच बैठकीत वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
सातारा जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. खासदार श्रीनिवास पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत वीज ग्राहकांना चार-पाच महिने बिल येत नाही. मीटरचे रिडिंग घेण्यात येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढून बिले येतात. हे कुठेतरी थांबण्याची गरज आहे. यापुढे प्रत्येक महिन्याला वीजबिल देण्यात यावे. तसेच वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी, अशी जोरदार मागणी सदस्यांनी केली. यावर पालकमंत्र्यांनी वस्तूस्थिती मान्य करत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना कामात बदल करण्याबाबत सूचना केली.
त्याचबरोबर शेती पंपांना विजेची जोडणी न मिळणे, ट्रान्सफार्मरची चोरी आदी मुद्देही बैठकीत मांडण्यात आले. तर खंडाळा तालुक्यातील सदस्याने तेथील औद्योगिक वसाहतीतील वीज गेल्यास तास-दोन तासात येते. पण, शेतकऱ्यांच्या विजेचा घोटाळा झाला तर आठ-दहा दिवस तो दुरुस्त होत नाही, अशी कैफियत मांडली.
बैठकीच्या शेवटी पालकमंत्र्यांनी शेतीसाठी असणारे ट्रान्सफार्मर लवकरात लवकर दुरुस्त करा. तसेच आमदारांनी सुचविलेली कामे पूर्ण करा. तसेच ती पूर्ण झाल्यानंतर त्यांना कळवा, अशी सूचना केली.
ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम विभागून करावे म्हणजे ट्रान्सफार्मर दुरुस्तीला वेळ लागणार नाही. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारीही कमी होतील, असे गृहराज्यमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.
चौकट :
वेळ जातो ; पण तक्रार सुटत नाही...
समिती तयार झाली आहे. दर महिन्याला वीज ग्राहकांचे गाऱ्हाणं ऐका. पण, तक्रारी कोणी ऐकत नाही. त्यामुळे लोक वैतागले आहेत. वेळ वाया जातो; पण तक्रारी काही सुटत नाही, असे रोखठोकपणे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुनावले. तसेच वीज वितरण कंपनीकडे येणाऱ्या तक्रारी संदर्भात दूरध्वनी क्रमांक द्यावा. या दूरध्वनीवर येणाऱ्या तक्रारींचे लवकरात लवकर निराकरण करावे. ज्या तक्रारी जिल्हापातळीवर सोडविण्यासारख्या आहेत. त्या लवकरात लवकर सोडवा, असेही स्पष्टपणे सांगितले.
फोटो दि.२४सातारा वीज कंपनी फोटो...
फोटो ओळ : सातारा येथे जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
.........................................................