साताऱ्यातील अॅड. सिमंतिनी नुलकर आणि स्वाती राऊत यांच्या संकल्पनेतून पुस्तक बिशीची स्थापना करण्यात आली. चार महिला एकत्र आल्या की त्यातून ज्ञान वाटपाचे काम झाले पाहिले. वाचनाची समृध्दता आणि मराठी भाषेची व्यापकता या दोन्हींचा सुवर्ण मिलाफ साधण्याचा संकल्प घेऊन याची मुहूर्तमेढ रोवली गेली. या बिशीत आता ४० सदस्यांचा सहभाग असतो. बिशीत समाविष्ट होण्याचा पुस्तक वाचनाची आवड हा एकच निकष असल्याने यात डॉक्टर, घरकामगार, अभियंते, विद्यावाचस्पती प्राप्त महिलांचा समावेश आहे.
पुस्तकांची बिशी याच नावाने सुरू असलेल्या या बिशीने गेल्या आठ वर्षांत अनेक महिलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण केली. महिन्यातून एकदा भेटणं आणि आपण वाचलेल्या पुस्तकांची कहाणी सांगण आणि इतरांच्या ऐकणं यात निघून गेलेला वेळ पुढं आयुष्यभरासाठी समृध्दता देऊन जातो, असे अनुभव यासाठी कार्यरत असलेल्या महिलांचे आहेत.
१. व्यक्त होण्यासाठी दिलं व्यासपीठ
पुस्तक बिशीच्या ग्रुपतर्फे अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यातही नाविन्य येण्याच्या उद्देशाने ग्रुपमध्ये एक फोटो पाठवून त्यावर काव्य करण्याचे ठरविण्यात आले. एका सुर्याेदयावर विविध पध्दतीने भाष्य करणाºया कवितांची निर्मिती हे या उपक्रमाचे फलित ठरले.
२. सर्व स्तरांतील महिलांचा सहभाग
पुस्तक वाचन आणि ज्ञानार्जन या दोन्ही बाबी आवडीवर अवलंबून असते. त्याला आर्थिक, सामाजिक आणि अनेकदा शैक्षणिक स्तराचाही काही संबंध रहात नाही, याची अनुभूती या बिशीत आली. घरगुती काम करणाºया महिलांनीही या बिशीचा एक भाग व्हायचं ठरवलं आणि माधुरी पेंढारकर आणि कुसूम कदरकर यात सहभागी झाल्या. पुस्तकांविषयी बोलण्याइतपत त्या भिडस्त झाल्या नसल्या तरी लेखक, त्यांची पुस्तकं आणि लिखाणाची खासियत यांची माहिती त्यांना यातून मिळाली.
३. उलटं कविता वाचन !
या ग्रुपच्या सक्रिय सदस्या सविता कारंजकर यांना उलटं गाणं गायची आणि उलट कविता वाचनाचा छंद आहे. यातूनही धम्माल करमणूक होते. गटात प्रगती पेंढारकर या विशेष मुलीनेही वाचनाची आवड जोपासत आपली बौध्दिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केला.
कोट :
या बिशी गटाच्या माध्यमातून अनेक पुस्तकं आणि उत्तम लेखक आम्हाला गवसले. नुकताच आम्हाला अश्वमेधतर्फे उत्कृष्ट ग्रंथ वाचक म्हणून गौरविण्यातही आले.
- अॅड. सिमंतिनी नुलकर, पुस्तक बिशी, सातारा