वाचनाने समृद्ध पिढी घडते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होणे, फार महत्वाचे आहे. ही आवड लहानपणापासून निर्माण व्हावी, या हेतूने लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण वाचन चळवळ या योजनेअंतर्गत शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत नगर वाचनालयाचे सभासद करून घेतले गेले आहे. आणि विनाशुल्क त्यांना पुस्तके पुरवण्यात येत आहेत. या योजनेला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभत आहे.
विक्रम वेताळ, छान छान बोधकथा, राष्ट्रीय नेत्यांची माहिती आणि गोष्टीची पुस्तके मुलांना वाचनासाठी उपलब्ध होत आहेत. कऱ्हाड शहरात परिसरातील सैदापूर, बनवडी, ओगलेवाडी, कार्वे, कापील, गोळेश्वर, वारूंजी या परिसरातील गावांबरोबर तालुक्यातील विविध गावातून मुले शिकण्यासाठी येत असतात. या मुलांचाही या योजनेत समावेश केला असल्याने या मुलांनाही वाचनालयाचा खजिना खुला झाला आहे. अनेक मुले येथे पुस्तक घेण्यासाठी व परत करण्यासाठी येत आहेत.
- कोट
मला गोष्टी वाचनाची आवड निर्माण झाली आहे. मी एसएमएस या शाळेत शिकत आहे. वाचन चळवळ सुरू केल्याने मला गोष्टीची पुस्तके उपलब्ध होऊ लागली आहेत. त्यामुळे गोष्टी वाचनाची आवड पूर्ण करता येत आहे.
- आर्या कोरडे
विद्यार्थिनी, कऱ्हाड