मायणी : ‘कोरोनाकाळात सर्वांनाच ऑक्सिजनची किंमत कळली. वृक्ष ऑक्सिजनचा पुरवठा करतात. वृक्ष खऱ्या अर्थाने परोपकाराचे आदर्श असल्याने वृक्षारोपण व त्याच्या संवर्धनाची नागरिकांनी जबाबदारी घ्यावी,’ असे प्रतिपादन मुख्याध्यापक पोपट मिंड यांनी केले.
‘झाडांचे शतक’ या वृक्षलागवड अभियानांतर्गत ढोकळवाडी (ता. खटाव) येथे मराठी शाळा व मरीमाता मंदिर परिसरात १५१ वृक्षांच्या वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच छाया जाधव, उपसरपंच पुंडलिक जाधव, मुख्याध्यापक बाळासाहेब खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य जिजाबाई जाधव, सुलाबाई निकम, शिवाजी तुपे, अनिल जाधव, महादेव पाटील वायदंडे महिला व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
सरपंच छाया जाधव व पोपट मिंड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वृक्षारोपण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. वड, चिंच, जांभूळ, आवळा आदी विविध जातींचे १०१ वृक्ष मराठी शाळा परिसरात, तर ५० वृक्ष मरिमाता मंदिर परिसरात लावण्यात आले. महिला बचत गट भजनी मंडळ किंवा संघर्ष मित्र ग्रुप, शालेय व महाविद्यालयीन युवकांनी परिश्रम घेतले ग्रामसेवक काळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले .
(वृक्षारोपण करताना सरपंच छाया जाधव, मुख्याध्यापक पोपट मिंड, काळे अण्णा व ग्रामस्थ संदीप कुंभार)